सेलिब्रिटी अनेकदा त्यांचे सार्वजनिक जीवन आणि दिसणे यांमुळे लोकांचे लक्ष्य बनतात. कधी त्यांना त्यांच्या कपड्यांवरून लक्ष्य केले जाते, तर कधी त्यांच्या वक्तव्यांवरून… आणि बऱ्याचदा त्यांना बॉडी शेमिंगदेखील केले जाते. बऱ्याच वेळा असे घडले आहे की, अभिनेत्रींचे फोटो वा व्हिडीओ त्यांच्या संमतीशिवाय काढले जातात आणि नंतर त्या अभिनेत्री विनोदाचा विषय बनतात. अलीकडेच काजोलबरोबर असे घडले, जे पाहून मिनी माथूर संतापली.
अभिनेत्री काजोलने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, ज्याचा व्हिडीओ एका पापाराझीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. तिने एक टाइट काळा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती अगदी सुंदर दिसत होती; परंतु काही वापरकर्त्यांनी ती गर्भवती असल्याची टिप्पणी करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी काजोलला तिच्या पोटावरून टोमणे मारले आणि बॉडी शेमिंगही केले.
मिनी माथूर काय म्हणाली?
जेव्हा मिनी माथूरने हे पाहिले तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही आणि काजोलचा व्हिडीओ बनवणाऱ्या पापाराझीला तिने फटकारले. तिने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “तुम्ही तिच्या शरीरावर झूम इन करण्याची हिंमत कशी केली? ती कशी दिसावी हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.”
काजोलला याआधीही अनेकदा युजर्सनी लक्ष्य केले आहे. काही काळापूर्वी तिला एका कार्यक्रमात हिंदीत बोलण्यास सांगितले असता, ती रागावली तेव्हा तिला लक्ष्य करण्यात आले होते. काजोलने पत्रकारांना उत्तर दिले की, ज्याला समजून घ्यायचे आहे तो समजेल. त्यामुळे लोकांनी काजोलवर खूप टीका केली.
काजोल आणि तिचा नवरा अजय देवगण कित्येक वर्षांपासून बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनय करीत आहेत. लोकप्रिय अभिनेत्री काजोल व अभिनेता अजय देवगण ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. या जोडीने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांसह सुखाचा संसार करीत आहेत. या जोडीला एक मुलगी व मुलगा अशी दोन मुले आहेत.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, काजोल आता ‘द ट्रायल : प्यार कानून धोखा’ या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यापूर्वी ती या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘माँ’ व ‘सरजमीन’ या दोन चित्रपटांमध्ये दिसली होती. काजोल आता ‘महाराणी : क्वीन ऑफ क्वीन्स’ या चित्रपटातही दिसणार आहे.