राणी मुखर्जीला या वर्षी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अनेकांना हा चित्रपट आवडला आणि राणी मुखर्जीच्या अभिनयाचे कौतुकही झाले.

आता चित्रपटाच्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बर यांनीही राणी मुखर्जीचे कौतुक केले आहे. तिने सांगितले की, चित्रपटात ब्रेस्ट पंपिंगचा सीन होता. तिला भीती होती की, राणी ते करण्यास नकार देईल; पण तिने ते केले. आशिमाने शाहरुख खानचेही कौतुक केले.

दिग्दर्शिका आशिमा छिब्बर ‘न्यूज१८’शी चित्रपटाबद्दल बोलल्या. तिने ब्रेस्ट मिल्क पंपच्या दृश्याचा उल्लेख केला. आशिमा म्हणाली की, तिला खात्री नव्हती की, राणी त्या दृश्यासाठी तयार असेल. त्या म्हणाल्या की, तिला तो सीन करायला विचारतानासुद्धा आम्हाला दडपण आलेले; पण राणी हिंमतवाली आहे. तिने ब्रेस्ट मिल्क पंपिंगचा सीन करायला लगेच तयारी दर्शवली. दूध काढायचं, ते पॅकेटमध्ये भरायचं आणि मग ते घेऊन जायचं, असा तो सीन होता. मला तिला याबद्दल विचारताही येत नव्हतं. तरीही मी तिला एकदा विचारलं की, मला वाटतं की तो पार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बाळ किती दूर आहे हे समजून येतं. त्यावर राणीनं लगेचच तयारी दर्शवली आणि तिनं म्हटलं की, आपण हा सीन करूया. फक्त तो कसा करायचा हे मला सांगा.

राणीचा अभिनय लोकांना इतका का आवडला हे आशिमाने सांगितले. ती म्हणाली, “तिनं मातृत्वाचं उत्तम उदाहरण दिले. म्हणजे तिनं पडद्यावर काय केलं ते पाहा? तिनं पडद्यावरून थेट लोकांच्या हृदयात प्रवेश केला. तिचा अभिनय उत्कृष्ट आहे.”

शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आशिमा म्हणाली, “मला ‘जवान’ खूप आवडला. मला शाहरुख खूप आवडतो. त्यानं चित्रपटात काय केलं, मेकअप वगैरे… सर्व काही. तो खरोखर कोणत्याही दिग्दर्शकाचं स्वप्न आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर, त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी तो या पुरस्कारास पात्र आहे. जिंकण्यासाठी त्याला ३३ वर्षं लागली. आता राणी आणि शाहरुख दोघांनीही एकाच वर्षी पुरस्कार जिंकला. हे प्रतिष्ठेचे आहे आणि ते चांगले मित्रदेखील आहेत.”