“असा माणूस पुन्हा होणे नाही”; ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णींनी बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली श्रद्धांजली

बाबासाहेबांनी शिवप्रेम म्हणजे काय हे प्रत्येकापर्यंत पोहचवलं असं मृणाल कुलकर्णी म्हणाल्या

Shivshahir-Babasaheb-Purandare-Death-mrunal-kulkarni

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या १०० व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर सर्वच स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

राजकिय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी बाबासाहेबांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहेत. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कौटुंबिक संबध होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णी यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी बाबासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. “बाबासाहेबांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाची वैयक्तीक हानी झालीय शिवाय आपलं सामाजिक नुकसानही झालंय. असा माणूस हा शतकांमधून एकदाच होतो आणि ती व्यक्ती आपल्यासोबच होती. त्यांचे आशिर्वाद आपल्यासोबत होते. हे खूप मोठं भाग्य होतं असं मला नेहमी वाटायचं. माझ्या बालपणापासून, पहिल्या पावलापासून त्यांचा हात माझ्या डोक्यावर होता. या दु:खात आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. ” असं मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.

बाबासाहेब पुरंदरेंचं निधन : श्रद्धांजली वाहताना अमोल कोल्हे म्हणाले, “माझ्या पिढीला जी गोष्ट दिसली त्यामध्ये…”

बाबासाहेबांनी शिवप्रेम म्हणजे काय हे प्रत्येकापर्यंत पोहचवलं असं मृणाल कुलकर्णी म्हणाल्या. “बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास होते. देवाची त्यांच्यावर कृपादृष्टी होती. असा माणूस पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृती सतत आपल्यासोबत राहतील.” असं म्हणत मृणाल कुलकर्णी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

तर शिवाजी महाराजांची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेले अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर त्यांना एका कार्यक्रमादरम्यानच श्रद्धांजली अर्पण केलीय. वयाच्या १०० व्या वर्षी बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झाल्याची बातमी काही पोर्टल्सच्या माध्यमातून आली. सर्व प्रथम त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो. आपला जाज्वल्य इतिहास अभिमानास्पद इतिहास जनतेसमोर मांडण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या पिढीला जी गोष्ट दिसली त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव अग्रक्रमानं घेणं हे आगत्याचं ठरेल. मी त्यांच्या प्रती व्यक्त केलेली एक कृतज्ञता ठरेल,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mrunal kulkarni paid tribute babasaheb purandare death kpw

ताज्या बातम्या