मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. यानंतर एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणी जोरदार कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने याप्रकरणी आचित कुमार या २२ वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. त्याला काल विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी विशेष न्यायालयाने एनसीबीला खडे बोल सुनावले. “केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे तो आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना ड्रग्ज पुरवत होता हे निश्चित करता येणार नाही,” असे कोर्टाने या सुनावणीदरम्यान म्हटले.

एनसीबीच्या मते, आचित कुमार हा ड्रग्जचा पुरवठादार असून तो ड्रग्जचा पुरवठा करण्याच्या व्यवसायात आहे. मात्र याबद्दलचा कोणताही पुरावा सादर करण्यास एनसीबी अपयशी झाली आहे. “त्यांच्याकडे आर्यन खानसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वगळता ठोस कोणताही पुरावा नाही. तसेच आचित कुमार या सर्व प्रकरणात गुंतलेला असल्याचे दाखवणारा पुरावाही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सच्या आधारे कुमार आरोपींना ड्रग्ज पुरवत होता, असं म्हणणं चुकीचे आहे,” असे सांगत कोर्टाने आचित कुमारला जामीन मंजूर केला.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर करण्यापूर्वीच विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी शनिवारी मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी नऊ आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला.

एनसीबीने अचित कुमारला २.६ ग्रॅम गांजासह अटक केली होती. तो आर्यन खानसोबत व्हॉट्सअॅप चॅट करत असल्याचा दावाही एनसीबीने केला होता. अचित कुमार हा ड्रग्ज सप्लायर असून तो गांजाचीही तस्करी करतो, असा दावा एनसीबीने केला होता. पण आचितच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना असे म्हटले की, “एनसीबीने पुराव्यांचा कोणताही आधार नसताना आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांचा कुमारवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्याचे करिअरवर याचा प्रभाव पडू शकतो.”

Video : आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.