‘देवमाणूस’ मालिकेतून प्रसिध्द झालेला अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेल्या ‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाचे संगीत प्रकाशन करण्यात आले. हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

‘नाद – द हार्ड लव्ह’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच ठाणे येथील आयबीस हॉटेल येथे मोठ्या थाटात झाला. अभिनेत्री शिवाली परब आणि उत्कर्ष शिंदे यांच्या सहजसुंदर सूत्रसंचालनाने नटलेल्या या सोहळ्याला चित्रपटातील प्रमुख कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक व निर्मातेही हजर होते. याप्रसंगी बोलताना प्रसाद ओक यांनी ‘नाद’च्या संपूर्ण चमूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे असून गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘डोळ्यांत तूच आहे…’ हे विनायक पवार यांनी लिहिलेलं गाणं अभय जोधपूरकर यांनी गायलं आहे. पवार यांनीच लिहिलेलं ‘तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे…’ हे गाणं आदर्श शिंदे आणि बेला शेंडे यांच्या सुमधूर आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. ‘नादखुळा डान्स करा रे…’ हे धमाल गीत वैभव देशमुख यांनी लिहिलं असून, आदर्श आणि आनंद शिंदे यांनी गायलं आहे. तर ‘जीवाचे हाल…’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं विनायक पवार यांच्याच लेखणीतून उतरलं असून, या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि सायली पंकज या गायकांचे सूर लाभले आहेत.

हेही वाचा >>>१४ दिवसांत घराबाहेर आलेल्या संग्राम चौगुलेची पहिली पोस्ट! Bigg Boss Marathi च्या प्रवासाबद्दल म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नाद’च्या गीत-संगीताबाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले, या चित्रपटात प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेली प्रेमकथा पाहायला मिळेल. या जोडीला उत्तम गीत-संगीताची साथ या चित्रपटाला लाभली आहे. किरण गायकवाडचं अँग्री यंग मॅन शैलीतील रूप प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. किरणच्या जोडीला सपना माने यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.