Nana Patekar Celebrate Guru Vijaya Mehta Birthday : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे विजया मेहता. अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून नाटकाचे धडे घेतले आहेत. विजया मेहता यांनी अभिनयाचे धडे शिकवलेल्या अनेक कलाकारांपैकी दोन नावं म्हणजे, अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री भारती आचरेकर. सिनेसृष्टीतील अनेक प्रतिथयश कलाकारांना रंगभूमीवर अभिनयाची मूळाक्षरं गिरवायला शिकवणाऱ्या विजया मेहता यांचा ४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता.
गुरु विजया मेहता यांचा हा ९१वा वाढदिवस साजरा करण्याकरता नाना पाटेकर त्यांच्या घरी गेले होते. अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी मिळून त्यांच्या गुरु विजया मेहता यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला. भारती आचरेकर यांनी विजया मेहता यांच्या या वाढदिवसाची खास पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
भारती यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये विजया मेहता यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळत आहे. भारती यांनी विजया मेहता यांच्याबरोबरचे त्यांचे आणि नाना पाटेकरांचे फोटो शेअर केले आहेत. तसंच या फोटोसह त्यांनी हा वाढदिवस कसा साजरा करण्यात आला, हेही थोडक्यात सांगितलं आहे.
भारती आचरेकर सांगतात, “४ नोव्हेंबर रोजी आमच्या गुरु लाडक्या विजया बाईंचा ९१ वा वाढदिवस होता. सकाळी-सकाळी नानाचा फोन आला आणि म्हणाला, ‘मी बाईंकडे जातोय तू पण ये.’ माझं शूटिंग दुपारी होतं. गुच्छ घेऊन गेले. नानाने दादर मार्केटमधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फुलं आणली होती. ती त्यानं सबंध घरभर २० एक फुलदाण्यांमध्ये सुरेख लावली होती. तो त्यातच मग्न होता. मी म्हटलं, ‘नान्या, गणपतीची आठवण आली.’ तर म्हणाला, ‘अगं विजयाबाई आपला गणपतीच आहे’. खूप कौतुक वाटलं त्याचं.. बाई (विजया मेहता) पण खूप आनंदात होत्या.”
भारती आंचरेकरांनी शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, भारती आचरेकरांनी शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी विजया मेहता यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत, तर काही नेटकऱ्यांनी नाना पाटेकर आणि भारती आचरेकर यांनी आपल्या गुरुचा वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे.
