Nana Patekar Helps : बॉलीवूडसह मराठी सिनेमांतून आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. आजवर अनेक सिनेमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनीही तितकंच डोक्यावर घेतलं आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत येणारे नाना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठीही तितकेच ओळखले जातात. नाना पाटेकरांनी आजवर अनेकदा सढळ हाताने मदत केली आहे. अशातच त्यांनी राजौरी व पुंछमधील ११७ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत केली आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीमारेषेवरील गोळीबाराचा परिणाम झालेल्या कुटुंबांना त्यांनी मदत केली.
२२ सप्टेंबर रोजी नाना पाटेकर फाउंडेशनचे विश्वस्त आणि सहकारी सदस्यांबरोबर राजौरी गॅरिसनला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रत्येक कुटुंबाशी वैयक्तिकरित्या संवाद साधला, त्यांची व्यथा ऐकली आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “देशात अशा घटना घडतात तेव्हा मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. ते आपलेच भाऊ-बहीण आहेत. आपल्याला हे सगळ्यांनी मिळून करायला हवं. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अशा प्रसंगी मदत करतात, पण ते प्रसिद्धीपासून दूर राहतात. आपणच मदत केली नाही तर दुसरं कोण करणार?”
“सरकार करतंय, पण आपणही काहीतरी करायला हवं”
यापुढे नाना पाटेकर म्हणाले, “सरकारने बरंच काही केलं आहे, पण फक्त त्यांच्यावर अवलंबून न राहता आपण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे. एखाद्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जे समाधान मिळतं, त्याची तुलना कशाशीच करू शकत नाही. मी आयुष्यात काही वर्ष सैन्यात होतो, त्यामुळे सैनिकांच्या भावना आणि त्यांचे संघर्ष मला माहीत आहेत.”
यापुढे नानांनी सांगितलं की, “ही फक्त सुरुवात आहे. मी पुन्हा राजौरीला येणार आहे आणि पुढच्या काळात या शाळांसाठी अजून काही महत्त्वाचं काम करणार आहे”, असंही नाना म्हणाले.
नाना पाटेकर यांनी आई-वडिलांच्या नावाने स्थापन केलेलं ‘निर्मला गजानन फाउंडेशन’ हे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात देशभर कार्यरत आहे. या उपक्रमाला भारतीय लष्कर आणि स्थानिक प्रशासनानेही सक्रिय पाठिंबा दिला असून, सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी काम सुरू आहे.