अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग्ज प्रकरणी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींची चौकशी केल्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमारच्या नावाची चर्चा होत आहे. दीपिकासोबत काम केलेल्या तीन सहकलाकारांना एनसीबी समन्स बजावणार असल्याचं समजतंय. या तीन कलाकारांच्या नावातील पहिलं अक्षर ‘S’ , ‘R’ आणि ‘A’ असल्याचं म्हटलं जात आहे. यातील ‘A’ अक्षरावरून अक्षय कुमारच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार या तीन कलाकारांची चौकशी होणार असून या तीनही कलाकारांनी दीपिकासोबत काम केलं आहे. त्यातील ‘A’ नावाचा कलाकार हा स्वत: ड्रग्जचं सेवन करतो आणि इतरांनाही पुरवतो, अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे.
अक्षय कुमार आणि दीपिकाने आतापर्यंत तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘हाऊसफुल’, ‘चांदनी चौक टू चायना’ आणि ‘देसी बॉइज’ या तीन चित्रपटांमध्ये अक्षय आणि दीपिकाने एकत्र काम केलं आहे. त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘A’ म्हणजे अक्षय कुमार तर नाही ना, असा अंदाज सोशल मीडियावर बांधला जात आहे.
रियाच्या जामीनास विरोध
सुशांत सिंह राजपूतला मृत्यूपूर्वी अंमलीपदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती हे अंमलीपदार्थांच्या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत, असा दावा करत त्यांना जामीन देण्यास अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मंगळवारी तीव्र विरोध केला.
रिया सक्रिय सदस्य आहे. तिने सुशांतला त्याचे सेवन करण्यास उद्युक्त केले. तसेच त्याला ते उपलब्ध करून दिले, त्यासाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोपही एनसीबीतर्फे यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. आरोपींनी केलेला गुन्हा हा संघटित गुन्हेगारीच आहे. अटकेच्या भीतीने रियाने काही सांगितले नाही. तिला हा सगळा प्रकार बेकायदा असल्याचे माहीत होते. त्यानंतरही ती त्यात गुंतली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.