सध्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता या चर्चेत आहेत. या चर्चा त्यांच्या जीवनावर आधारित ‘सच कहूं तो’ हे पुस्तक लाँच झाल्यामुळे सुरु आहेत. या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी गप्पा मारताना नीना गुप्ता यांनी त्या प्रेग्नंट असताना अनेकांनी लग्नासाठी विचारले असल्याचे म्हटले आहे. पण नीना यांनी सर्वांना नकार दिला होता. नकार देण्यामागचे कारणही नीना यांनी सांगितले आहे.

नीना गुप्ता या एकेकाळी वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होत्या. नीना आणि विवियन यांना एक मुलगी आहे. पण त्या दोघांनी कधीही लग्न केले नाही. नीना यांनी सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी सोनालीशी गप्पा मारताना प्रेग्नंट असताना कोणाशी लग्न का केले नाही याचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

‘मला स्वत:चा खूप अभिमान आहे. मी स्वत:ला समजावले होते की मी केवळ कोणाच्या तरी नावासाठी किंवा पैशासाठी लग्न करणार नाही. त्यामुळे मी प्रेग्नंट असताना लग्नाच्या अनेक ऑफर्सला मी नकार दिला. मला समलैंगिक व्यक्तीने देखील लग्नाची ऑफर दिली होती’ असे नीना गुप्ता म्हणाल्या.

आणखी वाचा : ‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांची मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटली होती लाज

विवियनवर प्रचंड प्रेम होते त्यामुळे कोणालाही लग्नासाठी होकार दिला नाही असे नीना यांनी पुढे म्हटले आहे. ‘आम्ही कधी तरी भेटायचो तरी देखील तो मला आवडायचा. आम्ही काही वर्षे एकत्र राहिलो होते. आम्ही एकत्र फिरायला जायचो. मसाबा त्याच्यासोबत वेळ घालवायची. कोणतीही समस्या नव्हती. विवियनचे लग्न झाले होते. त्याला मुले देखील होती. मला नेहमी ते दिवस आठवतात’ असे नीना गुप्ता म्हणाल्या.

नीना गुप्ता यांचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात नीना गुप्ता यांच्यासोबत अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसले. तर लवकरच, नीना या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गूडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत. अमिताभ आणि नीना यांच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि पावेल गुलाटी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे विकास बहल करणार आहेत.