scorecardresearch

नव्या दमाचे नवे कलाकार

आपली ओळख ही नव्वदीच्या दशकातल्या बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे यांची कन्या म्हणून होत असली तरी स्वत:च्या अभिनयाने आणि सौंदर्याने हिंदूी-सिनेअभिनेत्री अनन्या पांडेने गेल्या चार वर्षांत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

गायत्री हसबनीस

आपली ओळख ही नव्वदीच्या दशकातल्या बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे यांची कन्या म्हणून होत असली तरी स्वत:च्या अभिनयाने आणि सौंदर्याने हिंदूी-सिनेअभिनेत्री अनन्या पांडेने गेल्या चार वर्षांत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गेहराईयाँ’ या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना तिने आपल्या उमलत्या काळात मिळणारे प्रेक्षकांचे उदंड प्रेम, नामवंत दिग्दर्शकांसमवेत काम करण्याची संधी आणि अगदी कमी वेळात पदरी पडलेले सुपरहिट चित्रपट याविषयी ‘लोकसत्ता’शी मोकळेपणाने संवाद साधला.

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांच्यासोबत ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या २०१९ साली आलेल्या भव्यदिव्य चित्रपटातून अनन्याने हिंदूी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तिने लक्ष वेधून घेतले. त्यानंतर टाळेबंदीच्या काळात ओटीटीवर तिने ‘खाली पिली’ नावाचा चित्रपट अभिनेता इशान खत्तरबरोबर केला आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. मध्यंतरी तिची भूमिका असलेला ‘पती पत्नी और वोह’ हा चित्रपट आला होता, पण तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, नुकत्याच आलेल्या ‘गेहराईयाँ’ या चित्रपटातून बॉलीवूड सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत तिने एकत्र काम केले आहे. अशा काही ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आणि सुपरस्टार सहकलाकार यांच्यासह अभिनय केलेल्या अनन्याला नव्या दमाच्या कलाकार-दिग्दर्शकांसमवेत काम करताना नेहमीच आशावादी वाटते,

परिकथांपेक्षा किंवा तथाकथित चित्रपटांपेक्षा अधिक वास्तवाला भिडणारे विषय चित्रपटाच्या माध्यमातून साकारायला आणि तशा भूमिका करायला आवडतात, असं मत तिने व्यक्त केलं. ‘‘मला यापुढे वास्तवदर्शी कथा लिहिणाऱ्या दिग्दर्शकांसह काम करायला आवडेल, कारण दिग्दर्शक शकून बात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गेहराईयाँ’तून काम केल्यानंतर असे दिग्दर्शक फक्त परिकथा लिहिणारे, मांडणारे कथाकार नसून ते अधिक वास्तवाला धरून असणाऱ्या कथा लिहितात हे जाणवले. संवादशैलीही कृत्रिम नसल्याने पडद्यावर दिसणारा माणूस हा खरोखरच त्या परिस्थितीत अडकल्यावर कसा व्यक्त होईल, कसा बोलेल त्याच पध्दतीने तो पडद्यावर अभिनयातून व्यक्त होताना दिसतो. हे चित्रण वास्तवाच्या जवळ जाणारं असावं म्हणून कलाकारांकडून त्या पध्दतीने मेहनत करून घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी शकून बात्रा एक आहेत, असं मत तिने यावेळी व्यक्त केलं. त्यामुळे यापुढे नव्या दमाचे, नव्या विचारांचे दिग्दर्शक – लेखक आपल्या वाटय़ाला यावेत, अशी प्रांजळ इच्छा ती व्यक्त करताना दिसते. ‘‘रुपेरी पडदा किंवा ओटीटी माध्यमावरील कलाकृती असो प्रत्येक दृश्य चित्रित करताना माझी स्वत:बाबतची चाचपणी सुरूच असते. एक अभिनेत्री म्हणून मी समोर आलेल्या भूमिकेचा प्रचंड विचार करते, परंतु आत्तापर्यंत मी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे, त्यांनी त्याबाबतीत मला खूप मोकळीक दिली आहे. तसेच भूमिकेवर कसे काम करायचे हे सतत शिकवले आहे, त्याबाबतीत मार्गदर्शन केले आणि माझी सगळी भीती दूर केली’’, असेही तिने आवर्जून सांगितले. चित्रपटसृष्टीतलं आपलं मित्रमंडळ खूप मोठं आणि जिवलग असे असल्याचे तिने सांगितले. त्यात सुहाना खान आणि शनाया कपूर आपल्या लहानपणापासूनच खूप जवळच्या मैत्रिणी असल्याचे तिने सांगितले. सुहाना, अनन्या आणि शनाया या तिघींना तसं कित्येकदा समाजमाध्यमांवरून सतत त्यांचे चाहते फोटोंमधून नाहीतर व्हिडीओमधून एकत्र पाहात असतात. त्यांची मैत्रीही तशी लपून राहिलेली नाही, आमच्या तिघींमध्ये खूप जवळचे नातेसंबंध आहेत. एकाच क्षेत्राशी आम्ही निगडितही आहोत, त्यामुळे चित्रपटसृष्टीविषयी आपल्या खूप गप्पा होतात, असं ती म्हणते. अनन्याची लहान बहीण रास्या पांडे भविष्यात चित्रपट निर्माती होण्याची मनीषा बाळगून असल्याचेही तिने यावेळी नमूद केले. रास्या आत्तापासूनच चित्रपट क्षेत्राशी संलग्न गोष्टी लिहिते, वाचते आहे असेही तिने पुढे सांगितले.

अभिनयाबरोबरच अनन्या आपल्या नव्या कल्पनांना आकार देत सामाजिक कार्यातही हिरिरीने सहभागी होते. २०१९ मध्ये तिने ‘सो पॉझिटिव्ह’ हा समाजमाध्यमावरील उपक्रम सुरू केला होता. ज्यात समाजमाध्यमांवरील नकारात्मकता दूर व्हावी या हेतूने सुरुवात केली असे तिने सांगितले. ‘‘गेल्या वर्षी करोनाच्या दुसऱ्या लाटेतही मी ‘सोशल मीडिया फॉर सोशल गुड’ हा उपक्रम सुरू केला होता. त्यावेळी मी १० किशोरवयीन मुलांशी बोलले होते ज्यात त्यांनी समाजमाध्यमांचा वापर चांगल्या कामासाठी कसा केला होता, तसेच विशेषकरून टाळेबंदीतही तरुणांनी कशा प्रकारे समाजोपयोगी कामे केली होती याबद्दल तिने समाजमाध्यमांवरून जनजागृती केली होती. या उपक्रमातूनही अनेक चाहत्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला, असे तिने सांगितले.

आजतागायत आपल्या चित्रपटांच्या यशाबाबत नेहमीच आशावादी राहिले आहे, असे ती सांगते. तिकीटबारीवर चित्रपटाचे काय होईल?, याचा विचार करत चिंता करत बसणे हा आपला स्वभाव नाही, असे ती म्हणते. प्रेक्षकांच्या प्रतिसादाचेही कधी दडपण घेतले नसल्याचे तिने सांगितले. मला आजच्या चित्रपटांमधून समोर येणाऱ्या स्त्री व्यक्तिरेखा विशेष आवडतात. अशा भूमिकांमधून स्त्रियांची बलस्थाने समोर येतात, तसेच त्यांच्यातील काही उणिवाही प्रभावीपणे समोर येतात. अशा वास्तवदर्शी आणि दमदार व्यक्तिरेखांचा भाग व्हायला आवडेल, अशी इच्छाही तिने बोलताना व्यक्त केली.

‘‘माझे वडील नेहमी मला प्रोत्साहन देतात, एकतर मी निवडलेल्या संहिता माझे वडील वाचत नाहीत तर माझी आई वाचते. माझे आई-वडील नेहमी मला मार्गदर्शन करतात आणि ते माझे सर्वात मोठे समीक्षकही आहेत. आतापर्यंत मला माझ्या आई-वडिलांनी नेहमीच मला खूप प्रोत्साहन दिले असून त्यांच्या मदतीशिवाय मी स्वत:हून संहिता, व्यक्तिरेखेची निवड गेल्या चार वर्षांत सातत्याने करते आहे याचा त्यांना सर्वात जास्त आनंद आहे.’’

– अनन्या पांडे

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New artists bollywood actor actress acting aesthetically ysh

ताज्या बातम्या