बालप्रेक्षकांना मनसोक्त आनंद देण्याकरिता एक आगळेवेगळे आणि थरारक बालनाट्य लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे – ते म्हणजे उत्क्रांती घडवणारे बालनाट्य ‘माकडचाळे’. प्रशांत निगडे लिखित व दिग्दर्शित हे बालनाट्य केवळ विनोद आणि धमाल नाही, तर ते मुलांना निसर्गाशी जोडून, एक नवा आणि चित्तथरारक अनुभव देण्यास सज्ज झाले आहे.
माझे पूर्वज माझे सुपर हिरो असं घोषवाक्य
माझे पूर्वज, माझे सुपर हिरो! हे प्रभावी घोषवाक्य घेऊन येणारे हे नाट्य, आजकाल मोबाईलमध्ये हरवून जाणाऱ्या मुलांची कथा सांगते. सहलीला गेलेली काही मुले घनदाट जंगलात हरवतात. तिथे त्यांची एका माकडाशी झालेली मैत्री आणि त्यानंतर जंगलात त्यांनी केलेली धमाल, हे सर्व पाहणे प्रेक्षकांसाठी एक रोमांचकारी अनुभव ठरणार आहे.
नाटकाला प्रशांत निगडे यांचं दिग्दर्शन
दिग्दर्शक प्रशांत निगडे यांनी बालनाट्याची पारंपरिक चौकट मोडत शिशु, बाल आणि कुमार अशा तिन्ही वयोगटातील मुलांचा विचार करून या कथानकाची रचना केली आहे. परीकथा किंवा कार्टून पात्रांपेक्षा वेगळे, ‘माकडचाळे’ हे माकडाचे जगणे अनुभवून प्रेक्षकांना अचंबित करेल. हे नाट्य लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही त्यांच्या बालपणात घेऊन जाईल, यात शंका नाही!
रंगशीर्ष या नाट्यसंस्थेची निर्मिती
या बालनाट्याची निर्मिती ‘रंगशीर्ष’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून सतीश आगाशे आणि प्रशांत निगडे यांनी केली आहे. ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘बबन दादा’ आणि ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेले प्रशांत निगडे स्वतः माकडाच्या मध्यवर्ती भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. श्रद्धा शितोळे, ओमकार तेली, रुपेश जगताप हे तरुण कलावंत तसेच राकेश शिर्के, रितेश बायस, श्रुती हळदणकर, रिया साटम, प्रज्योत देवळे हे सहकलाकार वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.
१९ ऑक्टोबरला पहिला प्रयोग
या नाटकाचे शीर्षक गीत लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांनी गायले आहे, तर नागेश मोरवेकर यांचेही गाणे यात धमाल उडवून देणार आहे. बालगायक काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित यांनी गायलेली गाणी बालदोस्तांना नक्कीच आवडतील. या बालनाट्यासाठी संगीत रोहन पाटील, नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश योजना शीतल तळपदे, नृत्य दिग्दर्शन रुपेश बने, रंगभूषा मिलिंद कोचरेकर, वेशभूषा: सुप्रिया बर्वे, सूत्रधार दिनू पेडणेकर, व्यवस्थापन: विरीशा नाईक, डिझाईन संजय खापरे यांनी केले आहे. या बालनाट्य प्रकाशित करण्याची जबाबदारी ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान’ आणि ‘अनामिका’ या नाट्य संस्थांनी स्वीकारली आहे. ‘रंगशीर्ष’ निर्मित ‘उत्क्रांती घडवणारे माकडचाळे’ या बालनाट्याचा शानदार शुभारंभ दिवाळीत, १९ ऑक्टोबर, रविवारी, सकाळी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे. बाल रसिकांना एक जबरदस्त, चित्तथरारक आणि अर्थपूर्ण कलाकृती अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे.