scorecardresearch

नव्या मालिका, नवे चेहरे

जिकडे तिकडे चोहीकडे नवे चेहरे आणि त्यांच्या नव्या मालिका अशी अवस्था या महिन्याभरात प्रेक्षकांची झाली आहे.

नव्या मालिका, नवे चेहरे
नव्या मालिका, नवे चेहरे

मितेश रतिश जोशी

जिकडे तिकडे चोहीकडे नवे चेहरे आणि त्यांच्या नव्या मालिका अशी अवस्था या महिन्याभरात प्रेक्षकांची झाली आहे. हाच नाही तर अगदी ऑक्टोबर महिन्यातही नवे मालिका वा कार्यक्रम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.

‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’, ‘सोनी मराठी’, ‘स्टार प्रवाह’ या सगळय़ाच मराठी लोकप्रिय वाहिन्यांवर नव्या मालिकांचा डंका वाजला आहे. नव्या मालिकांच्या बाबतीत ‘झी मराठी’ वाहिनीने एकदम आघाडी घेतली आहे. प्राइम टाइमचा चेहराच बदलायचा जणू या उद्देशाने वाहिनीने सगळे नवे शो आणि मालिका या वेळेत आणल्या आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’, ‘अप्पी आमची कलेक्टर’ आणि ‘दार उघड बये’ या तीन नव्या मालिकांच्या माध्यमातून नव्या तर काही जुन्या कलाकारांची वर्णी लागली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या मालिकेमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून प्रमुख भूमिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य  ननावरे ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. या मालिकेतील नेत्राला भविष्यात घडणाऱ्या घटना आत्मज्ञानाने दिसत असतात. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. अनेक संकटांना तोंड देणारी नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘तू चाल पुढं’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या तीन मालिका आधीच प्रदर्शित झाल्या आहेत. त्यात ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अपर्णा माने (अप्पी) आणि नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सातत्याने वेगवेगळे विषय हाताळणारे वज्र प्रॉडक्शन या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळा विषय घेऊन आले आहेत.  या अगोदर त्यांच्या ‘लागीर झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘देवमाणूस २’ या मालिका गाजल्या आहेत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणं रंजक ठरेल. 

गेल्या आठवडय़ापासून ‘दार उघड बये दार उघड’ ही नवी मालिकाही ‘झी मराठी’वर दाखल झाली असून त्यातली मुख्य जोडी नवोदित असली तरी त्यांच्या बरोबरीने शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव अशी तगडी कलाकारांची फौज आहे. या मालिकेत सानिया चौधरी ही नवोदित अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. नाटक, मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. ती एक उत्तम नृत्यांगना असून या भूमिकेसाठी तिने संबळ वादनाचेही प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या संबळ वादनाचे व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहेत. एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुषप्रधान संस्कृती यांचा लढा या मालिकेत पाहायला मिळतो आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरही ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा भन्नाट कार्यक्रम याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. नावाप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा धिंगाणा आहे, हे मागच्या काही भागांत आपल्या लक्षात आलेच. कारण धिंगाणा घालायला प्रवृत्त करणारी व्यक्तीच कायम प्रचंड उत्साहाने भारलेली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून तब्बल ११ वर्षांनंतर तो ‘स्टार प्रवाह’बरोबर पुन्हा जोडला गेला आहे. अशा पद्धतीच्या वेगळय़ा कार्यक्रमाची मी वाट पाहात होतो, अशी प्रतिक्रिया सिद्धार्थने दिली. जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि विसाव्याचे काही क्षण मिळतात तेव्हा अंताक्षरी रंगल्याशिवाय राहात नाही. ‘स्टार प्रवाह’ परिवारातील दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगीतिक लढत रंगताना बघणं धमाल मनोरंजन आहे. हा नुसता संगीतमय कार्यक्रम नाही, तर बऱ्याच भन्नाट स्पर्धानाही कलाकारांना सामोरं जावं लागत असल्याने त्यांच्या कार्यक्रमातील आणि पडद्यामागच्या गमतीजमतीही या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत.

‘सोनी मराठी’ वाहिनीही ‘छोटय़ा बयोची मोठ्ठी स्वप्नं’ आणि ‘एकविरा आई’ या दोन मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. ‘छोटय़ा बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेचं विशेष म्हणजे आपल्या अभिनयातून कायमच वेगळेपण दाखवत आलेली एक कुशल अभिनेत्री वीणा जामकर या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर आगमन करते आहे. अनेक वर्ष सिनेमा आणि रंगभूमी याद्वारे आपली यशस्वी कारकीर्द घडवलेली अभिनेत्री वीणा जामकर एका आगळय़ावेगळय़ा अंदाजात या भूमिकेत दिसते आहे. तिचा गावाकडचा साधाभोळा पेहेराव प्रेक्षकांना विशेष भावतोय. कोकणात देवगडमधल्या नयनरम्य वातावरणात या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. तर ‘एकविरा आई’ या मालिकेचा केवळ प्रोमो प्रेक्षकांसमोर आला असून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला यायला दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

काही मालिका प्रस्थापित झाल्या की मग हळूहळू नव्या मालिका येतात. सध्या मात्र टीआरपीची गणितं इतकी बिघडली आहेत की एखादी नवी मालिका आल्या आल्या गुंडाळावी लागते. तर काही मालिका चांगले चेहरे असूनही कथानक भरकटल्यामुळे प्राइम टाइमला लवकर किंवा उशिराच्या वेळेत सरकतात. तर अनेकदा जुन्यांना बाजूला सारत नवंच काही दाखवण्याचं धाडस वाहिन्या करतात. म्हणूनच सध्या हा नवा नवा मामला प्रेक्षकांना सगळय़ा वाहिन्यांवर अनुभवायला मिळतो आहे.

बिग बॉस-४

कायम वादग्रस्त ठरूनही तितक्याच आवडीने मराठी घरात बघितला जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीमध्ये बिग बॉसचं स्थान कायम आघाडीवर असतं. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आधीच्या तिन्ही पर्वाप्रमाणे या चौथ्या पर्वाचं सूत्रसंचलनही प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच करणार आहेत. यंदा बिग बॉसची थीम ‘ऑल इज वेल’ असल्याने सारं काही छान आहे हे सांगणारं या पर्वाचं शीर्षकगीत खास प्रेक्षकांसाठी आधी प्रदर्शित करण्यात आलं आहे. याआधीच्या पर्वापेक्षा यंदाच्या पर्वाचं शीर्षकगीत खूपच हटके आहे. ‘चटर पटर चटर पटर बस झाली भाऊ’ असं म्हणत महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घ्यायला तयार झालेले आहेत. प्रेक्षकांनीही या शीर्षकगीतावर एकाहून एक जबरदस्त प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिल्या आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती या पर्वात सहभागी होणाऱ्या सेलेब्रिटी स्पर्धकांची. त्यासाठी मात्र सगळय़ांना २ ऑक्टोबपर्यंत थोडी कळ सोसावी लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या