अवघ्या काही दिवसांतच या वर्षाची सांगता होणार आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे वर्ष कसं काय सरसर निघून गेलं हाच प्रश्न अनेकांच्या मनात सध्या घर करु लागला आहे. त्यातही अनेकांच्या मनात रुखरुख आहे ती म्हणजे यंदाच्या वर्षी फसलेल्या संकल्पांची. नवीन वर्ष आणि हटके संकल्प हा जरी आता एक ट्रेंड बनला असला तरीही खूप कमी जणांचे संकल्प पूर्णत्वास जातात हेच खरे. काही कारणास्तव धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या धावपळीत सर्व काही निभावूनन नेताना कळत-नकळत या संकल्पांकडे दुर्लक्ष होतं. पण, तरीही सध्याच्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी कोणता संकल्प करायचा हा प्रश्न अनेकांच्याच मनात आल्यावाचून राहात नाही. असेच काहीसे झाले आहे ‘बन-मस्का’तील सर्वांच्या लाडक्या ‘सौमित्र’सोबत. म्हणजेच अभिनेता शिवराज वायचळसोबत. नवीन वर्ष आणि विधीवत चालत आलेल्या संकल्पांबद्दलच सांगत आहे शिवराज..
‘नवीन वर्ष सुरु होतंय. म्हणून एक नेहमीचा एक विधी ‘संकल्प करणे’ ह्याचा विचार मी यावर्षीही जरूर केला. पण, आजवरच्या अनुभवावरून यावेळी असं ठरवलंय की फार काही वेगळा असा कसला संकल्प करायचा नाही. कारण, असं काही ठरवलं तर ते पाळावं लागतं आणि जर का ते संकल्प फसले तर रुखरुख राहते’, असे सांगत ही झाली विनोदाची बाजू असे म्हणत शिवराज पुढे म्हणाला की, ‘मी काही गोष्टी मनात ठरवल्या आहेतच. नवीन वर्षाच्या निमित्ताने तशी स्वत:शी खूणगाठ ही बांधलीच आहे. पण, त्या गोष्टींचा कुठलाही गाजावाजा न करता निमूटपणे त्या तडीस नेण्यासाठीच मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी, ते संकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते नक्की कळेल’. ‘सध्या ‘बन-मस्का’ या मालिकेत काम करताना धम्माल येतेय. माझ्या मनात जी अनुभवांची पोतडी आहे, त्यात भरपूर मोलाचे अनुभव, आठवणींची भर दररोजच पडत आहे. आमच्या शीर्षकगीतातच म्हटलंय त्याप्रमाणे ‘स्ट्रेस बाजूला ठेवत जगण्याचा चस्का’ लागतोय. नवीन वर्षाच्या निमित्ताने माझं आपल्या सर्वांना हेच आवाहन आहे’ असे म्हणत शिवराने सर्वांना भरभरून प्रेम, आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवराज वायचळ सध्या झी युवा या वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘बन-मस्का’ या मालिकेत ‘सौमित्र’ची व्यक्तीरेखा साकारत आहे. या मालिकेची लोकप्रियता आणि तरुणाईच्या जवळ जाणारे कथानक पाहता मालिकेतील कलाकारांनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.