Sridevi Fasted 7 Days For Rajinikanth Health When He Was Unwell : श्रीदेवी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक स्टार्सबरोबर काम केले. काही स्टार्स असे होते की, ज्यांच्याबरोबर त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चांगली होतीच; पण ऑफ-स्क्रीनही चांगली बाँडिंग होती.
अशाच एका स्टारसाठी श्रीदेवी यांनी सात दिवस उपवास केला होता. एवढेच नाही, तर श्रीदेवी यांनी मंदिरात पूजाही केली होती. हे त्यांचे पती बोनी कपूर नव्हते. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून रजनीकांत होता. त्यांनी श्रीदेवी यांच्याबरोबर एक-दोन नव्हे, तर २० वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले होते. हे कलाकार खूप चांगले मित्र होते आणि पडद्यावर त्यांची एक आयकॉनिक जोडी होती. त्यांच्या या मित्रासाठी श्रीदेवी यांनी सात दिवस उपवासही केला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्रीदेवी यांनी रजनीकांत यांच्या तब्येतीसाठी हे सर्व केले होते. ही २०११ सालची गोष्ट आहे. तेव्हा रजनीकांत गंभीर आजारी पडले होते. त्यांना १० दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. २०११ मध्ये ‘राणा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे घडले. त्यांच्या प्रकृतीची बातमी ऐकताच श्रीदेवी यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात प्रार्थना केली होती. त्यानंतर, रजनीकांत लवकर बरे होण्यासाठी त्यांनी सात दिवस उपवास केला होता. त्या पुण्यातील साईबाबांच्या मंदिरातही गेल्या होत्या. श्रीदेवी यांच्या उपवासामुळे आणि सर्व चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे रजनीकांत निरोगी होऊन सेटवर परतले. रजनीकांत यांच्या भावाने एका मुलाखतीत सांगितले होते की, वजन कमी झाल्यामुळे आणि स्ट्रिक्ट डाएटमुळे त्यांची प्रकृती बिघडली होती.
लहानपणापासून एकत्र काम केले
रजनीकांत आणि श्रीदेवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यापैकी बरेच चित्रपट ब्लॉकबस्टर होते. त्यामध्ये ‘मुंद्रू मुदिचू’, ‘नान आदिमाई इलाई’, ‘पोक्किरी राजा’, ‘भगवान दादा’ व ‘चालबाज’ यांसारखे चित्रपट समाविष्ट आहेत. श्रीदेवी १५ वर्षांच्या असल्यापासून रजनीकांत यांच्याबरोबर काम करत होत्या. असेही वृत्त होते की, रजनीकांत श्रीदेवी यांच्याशी लग्न करू इच्छित होते; परंतु काही कारणांमुळे त्यांनी स्वतःच यातून माघार घेतली. १९९६ मध्ये श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. १९८१ मध्ये रजनीकांत यांनी लता रंगाचारी यांच्याशी लग्न केले; परंतु दोन्ही स्टार्समधील मैत्री नेहमीच अबाधित राहिली.