अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेस, डान्स आणि स्टंटने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टायगर श्रॉफच्या डान्स आणि फिटनेसचं कायमचं चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कौतुक केलं जातं. मात्र यावेळी टायगरच्या एका नव्या टॅलेंटचं सर्वत्र कौतुक होतयं. चाहतेच नव्हे तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टायगरच्या या नव्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

डान्स आणि फिटनेससोबतच टायगरला गायनाची देखील आवड आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत टायगर श्रॉफचं ‘वंदे मातरम्’ हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं. टायगर श्रॉफने गायलेल्या या सुरेल गाण्यात त्याच्या आवाजाच्या जादूसोबतच त्याचा दमदार डान्स पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यदिनी टायगरने हे गाणं ट्विटरवर शेअर केलं होतं. एक पोस्ट लिहित त्याने नरेंद्र मोदींना देखील या पोस्टमध्ये टॅग केलं होतं. या पोस्टमध्ये तो म्हणाला , “वंदे मातरम्…हे केवळ शब्द नाहीत, तर भावना आहेत. अशा भावना ज्या आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. या स्वातंत्र्यदिनी १३० कोटी भारतीयांसाठी एक छोटासा प्रयत्न”

हे देखील वाचा: सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्ताने साराने शेअर केला खास फोटो; क्यूट जेहने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

टायगर श्रॉफच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच प्रतिक्रिया देत त्याचं कौतुक केलंय. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले, “क्रिऐटिव्ह प्रयत्न. वंदे मातरम् बद्दल तू जे बोललास त्याच्याशी पूर्णपणे सहमत” असं मोदी म्हणाले.

हे देखील वाचा: पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल १२’चा विजेता, ट्रॉफीसोबत मिळाले ‘इतके’ लाख रुपये

तर मोदींनी दखल घेत प्रतिक्रिया दिल्याने टायगर श्रॉफला प्रचंड आनंद झाला असून त्याने एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. “तुमच्याकडून असं कौतुक होणं हे माझ्यासाठी भाग्य आहे. मी अत्यंत भारावून गेलो असून कृतज्ञ आहे” असं म्हणत टायगरने आनंद व्यक्त केलाय.

टायगर श्रॉफच्या ‘वंदे मातरम्’ या गाण्याला चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळताना दिसतेय.