ऋषी कपूर व नीतू कपूर यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. त्यांची प्रेमकहाणी १९७४ मध्ये ‘जहरीला इन्सान’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. १९८० मध्ये ऋषी व नीतू यांनी कायमचे एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि अभिनेत्री कपूर कुटुंबाची सून बनली.

ऋषी कपूर व नीतू यांच्या लग्न व डेटिंगशी संबंधित अनेक कथा चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहेत. एक कथा अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी संबंधित आहे, जी खूप प्रसिद्ध आहे. नीतू यांच्याआधी ऋषी कपूर त्याच्या प्रेमसंबंधांमुळे खूप चर्चेत होते. ते यास्मिन नावाच्या मुलीला डेट करीत असे, जिच्याशी त्यांचे ब्रेकअप झाले होते.

‘जहरीला इन्सान’ या चित्रपटाचे चित्रीकरण बाहेर होते आणि ऋषी कपूर ब्रेकअपच्या वेदना सहन करीत होते. त्यांच्या सहकलाकार नीतू सिंग होत्या. ते सेटवर अनेकदा मद्यपान करायचे, ज्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीतही केला होता. त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला : ऋषी कपूर अनसेन्सर्ड’ या चरित्रात त्यांनी असे काही खुलासे केले आहेत, जे धक्कादायक होते. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू यांनी फोन केला होता.

खरं तर, दारू प्यायल्यानंतर ते नीतू यांना त्यांची एक्स गर्लफ्रेंडला यास्मिनला फोन करायला लावायचे. त्यावेळी ते आणि नीतू चांगले मित्र होते. अभिनेत्याने त्यांच्या चरित्रात याबद्दल लिहिले होते, “आमच्या ब्रेकअपनंतर लगेचच, मी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ‘जहरीला इन्सान’च्या आउटडोअर शूटिंगसाठी गेलो होतो, जिथे मी दारू पिऊन माझी सह-कलाकार नीतू सिंग (जिच्याशी मी नंतर लग्न केले) हिला यास्मिनला फोन करून तिला माझ्याशी बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करायचो. त्यानंतर मी यास्मिनला काही वेळा भेटलो; पण तोपर्यंत मी आमचा ब्रेकअप स्वीकारला होता. नंतर तिने माझ्या एका खूप जवळच्या मित्राशी लग्न केले. नीतू नेहमीच तिच्याशी खूप चांगले वागायची आणि काही वर्षांपूर्वी तिच्या अचानक निधनाने मला खूप दुःख झाले.”

ऋषी कपूर व नीतू कपूर यांचे लग्न १९८० मध्ये झाले आणि त्यांना दोन मुले आहेत – रणबीर कपूर व रिद्धिमा साहनी. ऋषी यांचे २०२० मध्ये कर्करोगाने निधन झाले.