Operation Sindoor Neha Singh Rathore Shared Post : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. दहशतवाद्यांनी २६ भारतीय निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि सरकारने याचा बदला घ्यावा अशी मागणीही केली जात होती. अशातच भारतीय लष्कराने या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानला उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ केलं आणि दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्व क्षेत्रांसह हिंदी व मराठी कलाविश्वातून सरकारचं कौतुक केलं जात आहे. अशातच गायिका नेहा सिंह राठोडनेही मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर नेहाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. “नोटबंदी करून तुम्ही दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. मग हे कसे घडले? किती काळ देश तुमच्या वक्तृत्वाने चालवणार? की या हल्ल्यालाही आता नेहरूजी जबाबदार आहेत?” असे थेट प्रश्न तिने विचारले होते.
अशातच आजच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर गायिकेने सूर बदलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल प्रतिक्रिया देताना नेहाने ‘बाह्य शत्रूंसाठी आपण सर्व एक आहोत’ असं म्हणत एक्सवर पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. नेहाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “परस्पर मतभेद ही एक गोष्ट आहे. पण बाह्य शत्रूसाठी आपण सर्व एक आहोत. भारताच्या शत्रूने विसरू नये की, गरज पडल्यास या देशातील प्रत्येक नागरिक देशासाठी जीव देण्यास आणि घेण्यास तयार असेल.”
आपसी असहमतियाँ अपनी जगह हैं…लेकिन बाहर के दुश्मनों के लिए हम सब एक हैं…
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) May 7, 2025
…भारत के दुश्मन ये बात बिल्कुल न भूलें कि ज़रूरत पड़ने पर इस देश का हर नागरिक देश के लिए जान देने और जान लेने के लिए तैयार रहेगा…#OperationSindoor #IndianArmy pic.twitter.com/P8d8USm3tJ
या पोस्टसह नेहाने भारतीय सैन्य आणि तिरंग्याचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टआधी तिने एक ट्विट शेअर केलं होतं. या ट्विटमध्ये तिने “आतंकवाद्यांनी एक चिमूटभर सिंदूरची ताकद पाहिली” असं म्हटलं होतं. या ट्विटमधून तिने सरकारच्या कृतीचं कुठेही कौतुक केलं नाही. यामुळे ती सोशल मीडियावर टीकेची धनी बनली. तिच्या ट्विटबद्दल नेटकऱ्यांनी तिला घेरले आहे आणि ती आता सरकारला प्रश्न विचारणार नाही का? असं म्हटलं आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर नेहा सिंग राठोड सतत सरकारवर निशाणा साधत होती. हल्ल्या झाल्यापासून ती सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर केल्या होत्या. इतकेच नाही तर तिने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सरकारी प्रचारही म्हटले होते. सरकारवरील सततच्या टीकांमुळे तिच्यावर अनेक ठिकाणी तक्रारही दाखल झाली आहे. अशातच आता नेहाची ‘ऑपरेशन सिंदूर’वरील पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.