Selfiee Movie on OTT : गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाचं वर्षंही अक्षय कुमारसाठी काही खास ठरलं नाही. २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा आणि इमरान हाश्मीचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली. चित्रपटगृहापर्यंत प्रेक्षकांना खेचून आणण्यात सेल्फी अपयशी ठरला. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने केवळ ११.९ कोटींची कमाई केली. हा चित्रपट अक्षय कुमारच्या करिकीर्दीतील आजवर सर्वात कमाई करणारा ठरला.
या चित्रपटात अक्षय कुमारने विजय कुमार या सुपरस्टारची भूमिका निभावली होती तर इमरान हाश्मीने आरटीओ अधिकारी ओं प्रकाश अग्रवाल ही भूमिका निभावली होती. एक अभिनेता आणि एक सरकारी कर्मचारी यांच्यातील ही जुगलबंदी असली तरी बॉक्स ऑफिसवर मात्र ही जुगलबंधी काम करू शकली नाही. शिवाय या चित्रपटातून प्रथमच अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी एकत्र आले होते.
आणखी वाचा : Photos : बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते घराणेशाही; या ७ कुटुंबांचा आहे दबदबा
बॉक्स ऑफिसवर आपटलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. २१ एप्रिलपासूनच अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अक्षय आणि इम्रानचे चाहते यांना हा चित्रपट आता हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन घेऊन बघता येणार आहे.
हा चित्रपट ‘ड्रायविंग लायसेंस’ या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. राज मेहता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. १५० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा फारच कमी यश बॉक्स ऑफिसवर मिळालं आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला अक्षय कुमारचा हा सलग पाचवा चित्रपट आहे. याआधी अक्षयचे ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकलेले नाहीत.