Bhool Bhulaiyaa 3 OTT Release: कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षीत ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन ३७ दिवस झाले आहेत. दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), तृप्ती डिमरी (Tripti Dimpri), विद्या बालन व माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘भूल भुलैया 3’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनीस बज्मी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. अखेर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती समोर आली आहे.
‘भूल भुलैया 3’ हा ‘भूल भुलैया’ फ्रेंजायजीचा तिसरा भाग आहे. आधीच्या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच तिसऱ्या भागानेही बॉक्स ऑफिस गाजवलं. ‘भूल भुलैया 3’ अजूनही थिएटरमध्ये चालू आहे आणि दमदार कमाई करत आहे. आता कार्तिकचे काही चाहते हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख समोर आली आहे. हा चित्रपट तुम्हाला कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहता येईल, ते जाणून घेऊयात.
हेही वाचा – ‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल
कधी, कुठे प्रदर्शित होणार ‘भूल भुलैया 3’
‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाबरोबर अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ही रिलीज झाला होता. आता कार्तिक आर्यनचा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘भूल भुलैया 3’ २७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
‘भूल भुलैया 3’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
या चित्रपटाने ३७ दिवसांत जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत जगभरात ४२९.२९ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ला मागे टाकलं. ‘भूल भुलैया 3’ हा कार्तिक आर्यनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा – पुष्पा-श्रीवल्लीचा रोमान्स घरबसल्या पाहता येणार, Pushpa 2 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
‘भूल भुलैया 3’ चित्रपटाची कथा
‘भूल भुलैया 3’ मध्ये रक्तघाटाची शाही वंशज मीरा म्हणजेच तृप्ती डिमरी कशी रूह बाबा म्हणजेच कार्तिक आर्यनला ब्लॅकमेल करते आणि त्याला तिच्या वडिलोपार्जित हवेलीत जाण्यास भाग पाडते, ते दाखवण्यात आलं आहे. तिथे गेल्यावर ती रूह बाबाला मंजुलिकाच्या आत्म्यापासून शापित हवेली मुक्त करण्यास सांगते, जेणेकरून ती तिथे तिच्या कुटुंबासह आनंदी राहू शकेल. पण रूहबाबा हे करू शकतो की नाही, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.