Mahavatar Narsimha OTT Release: ‘सैयारा’बरोबर बॉक्स ऑफिस गाजवणारा आणखी एक चित्रपट म्हणजे महावतार नरसिम्हा होय. अश्विन कुमारचा अ‍ॅनिमेटेड मायथोलॉजिकल ड्रामा ‘महावतार नरसिम्हा’ चित्रपटगृहांमध्ये हिट ठरला. सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात करणाऱ्या या सिनेमाने नंतर ५० दिवस चित्रपटगृहांमध्ये दमदार कामगिरी केली. चित्रपटाने जगभरात तब्बल ३२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

‘महावतार नरसिम्हा’ हा मूळचा तमिळ चित्रपट आहे. पण तो हिंदी आणि इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. ‘महावतार नरसिम्हा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त एक कोटी रुपये कमावले होते. पण प्रेक्षकांनीच या चित्रपटाचं कौतुक केल्यामुळे हळुहळू सिनेमाची क्रेझ वाढू लागली. परिणामी ‘महावतार नरसिम्हा’ने ५० दिवस बॉक्स ऑफिस गाजवले. ४० कोटींचे बजेट असलेल्या ‘महावतार नरसिम्हा’ने देशभरात २९६.५० कोटी कमावले. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी उपलब्ध आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘महावतार नरसिम्हा’?

बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा हा महावतार नरसिम्हा चित्रपट आज (शुक्रवार) १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. गुरुवारी, नेटफ्लिक्स इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली. त्यात त्यांनी महावतार नरसिम्हाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केली. “या सिंहाची गर्जना एक साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते. १९ सप्टेंबर, दुपारी १२:३० वाजता नेटफ्लिक्सवर पाहा महावतार नरसिम्हा,” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

भारतातील सर्वाधिक रेटिंग असलेला चित्रपट

‘महावतार नरसिम्हा’ या २ तास १० मिनिटांच्या या अॅनिमेटेड चित्रपटाची कथा जुनीच आहे, पण अॅनिमेशन जबरदस्त आहे. ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटाने रेटिंगच्या बाबतीत अनेक भारतीय चित्रपटांना मागे टाकलं आहे. ‘महावतार नरसिम्हा’ हा Top 1 Highest Rated चित्रपट ठरला आहे. ‘महावतार नरसिम्हा’ एकमेव असा चित्रपट आहे, ज्याला आयएमडीबीवर ९.६ रेटिंग मिळाले आहे.

आणखी सहा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महावतार नरसिम्हा’चे बजेट ४० कोटी रुपये आहे. ‘महावतार नरसिम्हा’ हा महावतार सिनेमॅटिक यूनिव्हर्सचा पहिला चित्रपट आहे. आगामी १२ वर्षांमध्ये या फ्रेंचायझीचे आणखी सहा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘महावतार परशुराम’ २०२७ मध्ये, ‘महावतार रघुनंदन’ २०२९ साली, ‘महावतार द्वारकाधीश’ २०३१ साली, ‘महावतार गोकुलानंद’ २०३३, ‘महावतार कल्की भाग १’ २०३५ आणि ‘महावतार कल्की भाग २’ २०३७ साली प्रेक्षकांच्या भेटीला येईल.