संजय लीला भन्साली यांची गेल्या वर्षात सर्वात गाजलेली सिरिज म्हणजे ‘हिरामंडी’. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी अशा सर्व गोष्टी या सीरिज मधून पाहायला मिळाल्या. या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मीन सेगल, फरदीन खान, ताहा शाह बदुशाह, अध्यायन सुमन, शेखर सुमनसारखी कलाकार मंडळी होती.

यापैकी अभिनेत्री शर्मीन सेगलने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री नुकतीच आई झाली आहे. शर्मिनच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी शर्मीन सेगलच्या घरी पाळणा हलला आहे. पत्रकार विक्की लालवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. विक्की लालवाणी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

३१ मे (शनिवार) संध्याकाळी विक्की लालवाणींनी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये अभिनेत्री शर्मिनने २८ मे रोजी आपल्या बाळाला जन्म दिल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप जोडप्याकडून याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण विक्की लालवाणींनी शेअर केलेल्या पोस्टमुळे शर्मीनचे अनेक चाहते तिच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव करत आहे.

शर्मीनने २०२३ मध्ये टोरेंट फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी संचालक अमन मेहता यांच्याशी लग्न केलं होतं. इटलीमध्ये कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघेही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर दोन वर्षांनी ते आई-बाबा झाल्याने घरी आनंदाचं वातावरण आहे. अमन मेहता यांच्याशी लग्न झाल्यानंतर शर्मीन हैदराबादला शिफ्ट झाली आहे.

शर्मीन सेगलच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, २०१९ मध्ये तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मीजान जाफरीबरोबरच्या ‘मलाल’ चित्रपटातून तिच्या बॉलीवूड कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटाची निर्मिती तिचे काका संजय लीला भन्साळी यांनी केली होती. तर त्यांच्याच ‘हिरामंडी’ या सीरिजमुळे ती प्रसिद्धी झोतात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सीरिजमध्ये शर्मीनने आलमझेब ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचं कौतुकही झालं. पण संवादामुळे तिला काही प्रमाणात ट्रोलही केलं गेलं होतं. शिवाय तिने जॅकी श्रॉफ आणि प्रतीक गांधी यांच्याबरोबर ‘अतिथी भूतो भव’ या हॉरर-कॉमेडीमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते.