OTT Releases of November : ओटीटीमुळे आता मनोरंजन अगदी सहज आणि सोपं झालं आहे. प्रेक्षकांना अगदी घरबसल्या जगातली कोणतीही कलाकृती घरी बसून पाहता येते. त्यामुळे अनेक ओटीटीप्रेमी दर आठवड्यात नवी सीरिज किंवा सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत असतात.
नोव्हेंबर महिन्यातही विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नवनवीन सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तसेच काही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सीरिज-सिनेमे दाखल होणार आहेत. त्यामुळे हा महिना मनोरंजनाच्या दृष्टीने खूपच खास असणार आहे. या आठवड्यात रिलीज झालेले सीरिज आणि सिनेमे कोणते आहेत? चला जाणून घेऊ…
महाराणी सीझन ४
बहुचर्चित ‘महाराणी’ सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी पुन्हा एकदा राणी भारतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीझनमध्ये राजकारणातली नवी महाआघाडी, त्यात होणारी फसवणूक आणि सत्तेसाठीचा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दमदार संवाद आणि हुमा कुरेशीचा अप्रतिम अभिनय या सीझनचं वैशिष्ट्य आहे. ‘महाराणी ४’ ही सीरिज ७ नोव्हेंबरपासून SonyLIV वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
फर्स्ट कॉपी सीझन २
फर्स्ट कॉपी’चा दुसरा सीझन सिनेमा जगतातल्या पायरसीवर आधारित आहे. काही लोक अवैधपणे चित्रपट कसे लीक आणि वितरित करतात, यावर फर्स्ट कॉपी सीरिज आधारित आहे. या सीझनमध्ये मुनव्वर फारुकी, आशी सिंह, साकिब अयूब व रझा मुराद हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. थ्रिल, सस्पेन्स व अॅक्शन्स असलेल्या ‘फर्स्ट कॉपी’चा दुसरा सीझन ४ नोव्हेंबरपासून MX Player आणि Amazon वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
बॅड गर्ल
दिग्दर्शक वर्षा भरत आणि अभिनेत्री अंजली शिवरामन यांचा हा तमिळ सिनेमा एका मुलीच्या आत्मशोधाच्या प्रवासावर आधारित आहे. ‘रम्या’ नावाची मुलगी शाळेपासून प्रौढपणापर्यंतचा प्रवास करताना समाजाच्या चौकटी, कौटुंबिक अपेक्षा आणि स्वतःच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा यांच्याशी झुंज देते. तिची ही झुंज ‘बॅड गर्ल’मधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. ‘बॅड गर्ल’ सिनेमा जितका हळवा आहे; तितकाच तो वास्तववादीही आहे. हा सिनेमा ४ नोव्हेंबरपासून JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
दिल्ली क्राईम सीझन ३
शेफाली शाह यांच्या ‘दिल्ली क्राईम’ या लोकप्रिय सीरिजचा पहिला सीझन निर्भया प्रकरणावर आधारित होता आणि दुसऱ्या सीझनमध्ये ‘कच्छा-बनियान गँग’ची कथा दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता ‘दिल्ली क्राईम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मानव तस्करीच्या जगातलं भीषण वास्तव पाहायला मिळणार आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी Netfix वर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
द फॅमिली मॅन सीझन ३
‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमधून श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासह ओटीटीवर धमाल करायला सज्ज आहे. मनोज बाजपेयी पुन्हा आपल्या या हिट सीरिजमधून लोकांच्या मनावर ताबा मिळवणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून Prime Video वर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
