Vash Hindi Remake Shaitaan on OTT: तुम्हाला भयपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर उपलब्ध असलेला हा चित्रपट नक्की पाहायला हवा. सर्वात आधी गुजराती भाषेत तयार झालेला हा चित्रपट नंतर हिंदीतही बनवण्यात आला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. त्यामुळे तो पाहण्याआधी पहिला भाग पाहणं महत्त्वाचं आहे. या चित्रपटाचं नाव ‘वश’ असं आहे.
जानकी बोडीवाला, हितेन कुमार, हितेन कनोडिया व आर्यन संघवी या कलाकारांनी ‘वश’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
वश लेव्हल 2 प्रेक्षकांच्या भेटीला
वश लेव्हल 2 हा चित्रपट २७ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा गुजराती चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिलाय किंवा पाहायचा आहे त्यांनी त्याचा पहिला भाग म्हणजेच ‘वश’ ओटीटीवर पाहायला हवा.
वश ओटीटीवर कुठे पाहता येईल?
तुम्हाला ‘वश’ पाहायचा असेल तर तुम्ही तो शेमारू प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटाला ओटीटीवरही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर याचा हिंदी रिमेक करण्यात आला. गुजरातीप्रमाणेच हिंदी रिमेकचीही खूप चर्चा झाली.
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘वश’ला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच, जानकी बोडीवालाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला.
‘वश’ चित्रपटाची कथा
एक कुटुंब सुट्टी घालवायला अहमदाबादजवळच्या एका गावात जातं. तिथे या कुटुंबाला एक प्रताप नावाचा अनोळखी व्यक्ती भेटते. त्या व्यक्तीच्या येण्याने या कुटुंबाच्या अडचणी प्रचंड वाढतात. या चित्रपटातील भयंकर दृश्ये पाहून तुम्हाला भीती वाटेल.
‘वश’चा हिंदी रिमेक पाहिलात का?
‘वश’चा हिंदी रिमेक बनवण्यात आला, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘वश’च्या हिंदी रिमेकचं नाव ‘शैतान’ आहे. या सिनेमात अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका व जानकी बोडीवाला हे कलाकार होते. ‘शैतान’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
‘वश लेव्हल 2’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपट सध्या थिएटरमध्ये चालत असल्याने तो ओटीटीवर कधी येईल, याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. पण एखादा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर एक ते दीड महिन्यात ओटीटीवर येतो, ते पाहता ‘वश लेव्हल 2’ ऑक्टोबरमध्ये ओटीटीवर येऊ शकतो.