बॉलीवूडमधील काही जुन्या चित्रपटांच्या कथा ताकदीच्या आणि हृदयस्पर्शी असतात. सिनेरसिक आजही काही जुने चित्रपट आवर्जून पाहतात. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला होता. त्या चित्रपटाचा शेवट पाहताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. ओटीटीवर आजही लोक हा चित्रपट पाहतात.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्यात शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर सैफ अली खाननेही सहाय्यक भूमिकेत दमदार अभिनय केला होता. तसेच इतर अनेक अन्य दिग्गज कलाकार या चित्रपटात होते. या चित्रपटाचं नाव ‘कल हो ना हो’ आहे.

‘कल हो ना हो’ची कथा

Kal Ho Naa Ho on OTT : २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कल हो ना हो’ हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेम, आयुष्य आणि नात्यांचे खरे अर्थ शिकवतो. कथानक न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या नैना (प्रीती झिंटा) हिच्या आयुष्याभोवती फिरते. नैनाचे आयुष्य तणाव आणि समस्यांनी भरलेले असते. वडिलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या आणि आईच्या खांद्यावर येते. तिच्या आई आणि आजीमध्ये सतत वाद होत असतात. याचदरम्यान त्यांच्या शेजारी एक तरुण राहायला येतो. त्याचं नाव अमन माथुर (शाहरुख खान) असतं. अमनच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याची सकारात्मक वृत्ती हळूहळू सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडवते.

चित्रपटात दाखवलंय की अमनच्या येण्याने नैनाच्या कुटुंबात प्रेम वाढतं. सगळे एकत्र प्रेमाने राहतात. हे सर्व पाहून नैना हळूहळू अमनवर प्रेम करू लागते. मात्र, अमन माथुर आपल्या कुटुंबापासून एक मोठी गोष्ट लपवत असतो. त्याला हृदयाशी संबंधित गंभीर आजार असतो. त्यामुळे आपल्या जाण्यानंतर नैनाला त्रास होऊ नये, असं त्याला वाटतं. म्हणूनच अमन आपल्या जवळच्या मित्र रोहितशी (सैफ अली खान) नैनाचं नातं जोडून देण्याचा प्रयत्न करतो.

या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल इतका हृदयस्पर्शी आहे. थिएटर्समध्ये प्रेक्षक हा प्रसंग पाहून रडू लागले होते. ‘कल हो ना हो’ हा सुंदर चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहू शकता.