Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 on OTT : सध्याचा काळ हा ओटीटीवरील वेब सीरिज आणि चित्रपटांचा असला तरीही टीव्हीवरील मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकवर्गाची संख्या काही कमी झालेली नाही. आजही छोट्या पडद्यावरील मालिका पाहणारा प्रेक्षकवर्ग आहे, जो आवडीनं न चुकता मालिका बघतो. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशीच एक गाजलेली मालिका, जी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे आणि ती म्हणजे ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ मालिका.
‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ ही टेलिव्हिजनची सर्वांत गाजलेली मालिका होती. संस्कारी सून आणि सासूबरोबर असलेलं तिचं नातं… ही कौटुंबिक गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मालिका विश्वातील गाजलेली ही मालिका आता नव्या सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेची निर्माती एकता कपूरने दुसऱ्या पर्वाची घोषणा केली होती.
२५ वर्षांपूर्वी ज्या दिवशी ही मालिका सुरू झाली होती, अगदी त्याच दिवशी म्हणजेच आज २९ जुलै रोजी मालिकेचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज २९ जुलै २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता ही मालिका टीव्हीवर प्रक्षेपित होणार आहे. स्टार प्लस या वाहिनीवर ही मालिका पाहता येणार असून, जिओ हॉटस्टार या ओटीटी माध्यमावरसुद्धा ही मालिका पाहता येणार आहे. दररोज रात्री १०:३० वाजता जिओ हॉटस्टारवर ही मालिका पाहायला मिळेल
‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ ही मालिका ३ जुलै २००० पासून ते ६ नोव्हेंबर २००८ पर्यंत चालली. मालिकेचे एकूण १८३३ भाग प्रसारित झाले होते. त्यामुळे ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक मोठा मैलाचा दगड ठरली. आजही या मालिकेतील संवाद, प्रसंग आणि पात्रं प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या सीझननिमित्त स्मृती इराणीसुद्धा तब्बल २५ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. विशेष बाब म्हणजे स्मृती इराणी स्वतः पुन्हा ‘तुलसी’च्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यामुळे स्मृती इराणी यांचं हे पुनरागमन त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते त्यांना पुन्हा तुलसीच्या भूमिकेत पाहण्यासाठी सज्ज आहेत.