नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ या वेबसीरिजचं भूत अजूनही प्रेक्षकांच्या डोक्यातून निघालेलं नाही. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता पर्यंत या सीरिजचे ५ भाग प्रदर्शित झाले आहेत. याच्या शेवटच्या भागादरम्यान या सीरिजचे चाहते चांगलेच भावूक झाले होते.

स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या सीरिजमधल्या प्रत्येक पात्राला भारतीय प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. प्रत्येक शहरावरून दिलेलं प्रत्येक पात्राला नाव आणि त्याची खासियत अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.

आणखी वाचा : निर्मात्याने आयुष्मानला दिला होता ब्लँक चेक; किस्सा सांगत अभिनेता म्हणाला, “मी लक्ष्मीपेक्षा…”

याच पात्रांपैकी एक अत्यंत लोकप्रिय असं पात्र म्हणजे ‘बर्लिन’. या पात्राची कथा खरंतर पहिल्या चोरीनंतर संपली होती. पण प्रेक्षकांनी ‘बर्लिन’ला जे प्रेम दिलं ते पाहता या सीरिजच्या मेकर्सनी पुढील भागातही बर्लिनला एका वेगळ्या पद्धतीने समोर आणलं. बर्लिनला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं, त्याचं बोलणं, देहबोली, समोरच्याला संमोहित करणारं व्यक्तिमत्त्व आणि या सीरिजमधील त्याचं महत्त्व यामुळे बर्लिन लोकांच्या लक्षात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचवा सीझन संपल्यानंतरही ‘बर्लिन’ हा पुन्हा येणार अशी चर्चा सुरू होती. कित्येक फॅन्सना बर्लिनचा शेवटच कबूल नव्हता. आता मात्र खरंच ‘मनी हाईस्ट’ चाहत्यांसाठी नेटफ्लिक्सने खुशखबर दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून नेटफ्लिक्सने ‘बर्लिन’वर एक स्वतंत्र स्पिन ऑफ सीरिज घेऊन येत असल्याचं जाहीर केलं आहे. नेटफ्लिक्सने एक छोटासा व्हिडिओदेखील शेयर केला आहे. ‘मनी हाईस्ट’ चाहत्यांसाठी ही खरंच एक खुशखबर आहे. अजूनतरी या सीरिजची तारीख किंवा इतर माहिती समोर आली नसली तरी लवकरच बर्लिनची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.