कोविड काळात चित्रपटगृहं बंद झाली अन् अनलॉक काळात ती सर्वात शेवटी खुली करण्यात आली. यादरम्यान लोकांची ओळख ओटीटी प्लॅटफॉर्मशी झाली. प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, वूट अशा विविध प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रेक्षक येऊ लागला अन् नकळतच त्यांना या सगळ्या प्रकाराची सवय झाली. चित्रपट, मालिका ते थेट ओरिजिनल वेब सीरिज लोकांना यावर पाहता येऊ लागल्या. शिवाय चित्रपट जाऊन पाहण्याच्या खर्चात सगळ्या एकाहून जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप घेऊन जगभरातील कलाकृतींशी भारतीय प्रेक्षकांची ओळख झाली.
यापैकीच ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतात जम बसवला. अनुराग कश्यपच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमुळे प्रेक्षक या प्लॅटफॉर्मकडे वळले अन जगभरातील सगळा कंटेंट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत असल्याने इथे स्थिरावले. केवळ ओटीटी प्लॅटफॉर्म न राहता, नेटफ्लिक्स ही चित्रपट आणि वेबसीरीज निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वाची मोठी कंपनी झाली आहे.




आणखी वाचा : सुपरहीट मराठी चित्रपट ‘सुभेदार’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर; वाचा कुठे पाहायला मिळणार?
आज एवढी मोठी उलाढाल करणारी ही कंपनी एकेकाळी अमेरिकेत चित्रपटांच्या डीव्हीडी घरोघरी पोचवायची. लोकांना डीव्हीडीच्या माध्यमातून त्यांना जो हवा आहे तो चित्रपट उपलब्ध करून देण्याचं काम ही कंपनी करायची. याबरोबरच ही कंपनी डीव्हीडी भाड्याने देण्याचं कामही करायची. ओटीटी क्षेत्रात एवढी मजल मारूनही ही कंपनी आजपर्यंत डीव्हीडी भाड्यावर द्यायचं काम करायची.
आता मात्र हा विभाग बंद होणार असून येत्या शुक्रवारी नेटफ्लिक्स आपली शेवटची डीव्हीडी ऑर्डर प्लेस करणार आहे. १९९८ साली नेटफ्लिक्सने ‘बीटलज्यूस’ या चित्रपटाची डीव्हीडीची ऑर्डर दिली होती. नेटफ्लिक्सच्या या डीव्हीडी डिस्ट्रिब्यूशन प्लांटमध्ये त्यावेळी ५० लोक काम करायचे त्यांची संख्या आता फक्त ६ वर आली आहे. नेटफ्लिक्स आपल्या डीव्हीडीज या लाल रंगाच्या खास लिफाफ्यात पाठवत असत. त्यामुळे लाल लिफाफा ही कंपनीची ओळख बनली होती.येत्या शुक्रवारी आता शेवटचे काही लाल लिफाफे पाठवण्यात येणार आहेत. एका अर्थी हा एका पर्वाचा अंतच म्हणायला लागेल.