Best Movies on Netflix : सस्पेन्स, थ्रिलर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ओटीटीवर खूप कंटेंट उपलब्ध आहे. बॉलीवूड, दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच जगभरातील कलाकृती आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की शेवटपर्यंत तुमची स्क्रीनवरून नजर हटणार नाही. ४ वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल २०२४ मध्ये आला होता.

या चित्रपटाचे नाव आहे ‘हसीन दिलरुबा.’ २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दमदार कथेमुळे हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करू लागला होता. चित्रपट इतका गाजला की त्याच्या सिक्वेलची मागणी करू लागले. मग निर्मात्यांनी २०२४ मध्ये त्याचा सिक्वेल आणला. या चित्रपटात राणी व रिशूची कथा दाखवण्यात आली आहे. अरेंज मॅरेजनंतर दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसतं. त्याच्या नात्यात कटुता येते आणि दोघेही एकमेकांपासून दुरावतात.

‘हसीन दिलरुबा’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट एका खून प्रकरणानंतर येतो. या ट्विस्टनंतर चित्रपटाच्या कथेत मोठे बदल होतात. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होते की हा चित्रपट पाहिल्यानंतर, खरा खुनी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो. चित्रपटाची कथा इतक्या उत्तम पद्धतीने लिहिली आहे, की तुम्ही तो शेवटपर्यंत पाहाल.

२ तास १६ मिनिटांच्या हसीन दिलरुबा चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी, हर्षवर्धन राणे, आशिष वर्मा आणि अदिती चौहान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले असून कनिका ढिल्लनने सिनेमा लिहिला आहे. नंतर आलेल्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या दुसऱ्या भागाला हसीन दिलरुबाइतकी प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.

‘हसीन दिलरुबा’ला आयएमडीबीवर ६.९ रेटिंग मिळाले होते. तर, दुसरा भाग ‘फिर आई हसीन दिलरुबा’ला आयएमडीबीवर ५.८ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही हे दोन्ही चित्रपट पाहिले नसतील, तर ते नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहू शकता.