Nikki Tamboli Support Arbaaz Patel : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या शोमध्ये हे दोघे एकत्र आले. शोमध्ये ते एकमेकांना पाठिंबा देताना दिसले. या शोमध्ये ते एकमेकांना खेळाबद्दल सूचना देतानाही दिसले. ‘बिग बॉस मराठी ५’नंतर अरबाजने Rise And Fall या शोमध्ये सहभाग घेतला असून, निक्की या शोबाबतही त्याला मार्गदर्शन करताना दिसत आहे.
Rise And Fall मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भागात धनश्री वर्मा आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये जवळीक पाहायला मिळाली होती. त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच अनेकांनी याबद्दल त्याच्यावर टीकासुद्धा केली होती. याचबद्दल अरबाजची समजूत काढण्यासाठी निक्की Rise And Fall शोमध्ये गेली होती. तसंच तिनं त्याला शोमधील खेळाबद्दलही समजावून सांगितलं.
शोमध्ये अरबाजनं धनश्रीला तिनं घरातील पुरुष स्पर्धकांना समोरून मिठी (Front Hug) न मारता, बाजूनं मिठी (Side Hug) मारावी, असं म्हटलं होतं. त्याबद्दल अरबाजवर नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्याच्या त्या वक्तव्यानंतर धनश्रीबरोबरच्या नात्याबद्दलही चर्चा झाल्या होत्या. त्याचबद्दल निक्कीनं त्याला स्पष्टपणे सांगितलं, “तिनं कुणाला समोरून मिठी मारावी की बाजूनं मिठी मारावी, हे सांगणं गरजेचं नव्हतं. खेळाशिवाय तुझं हे काय सुरू आहे, ते बंद कर. बाहेर काय चाललंय, तुला कल्पनाही नाही.”
पुढे निक्कीनं अरबाजला सांगितलं, “या खेळात तुझी मोठी स्पर्धक कोण असेल, तर ती धनश्री आहे. या शोमधील सर्वांत जास्त नावडती स्पर्धक कोण असेल, तर ती धनश्री आहे. गेटच्या बाहेर गार्डलासुद्धा ती आवडत नाही. धनश्रीनं किती वेळा म्हटलंय, “मी अरबाजबरोबर कधी उभी राहणार नाही. ती सुरुवातीला मला आवडायची; पण आता समजतंय की, ती तिचा गेम खेळत आहे.”
पुढे निक्कीनं अरबाज़ला थेट सांगितलं, “संस्कार आणि आदर या गोष्टी गेमपेक्षा मोठ्या असतात. चांगलं वाग. लोक तुला का नापसंत करीत आहेत माहीत आहे का? कारण- तू खूप शिव्या देतोस. का देतोस? तुझ्या कुटुंबीयांनी हे सगळं पाहिलं तर? आई, बाबा व आजीला तुझा अभिमान आहे. तूच या शोमधील नंबर वन स्पर्धक आहेस, हे मी सगळ्यांसमोर ठामपणे सांगते.”
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांचा व्हिडीओ
निक्कीनं घातलेल्या समजुतीबद्दल सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे. अनेक जण योग्य जोडीदार कसा असला पाहिजे, तर निक्कीसारखा असला पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दरम्यान, आता निक्कीनं समजावल्यानंतर अरबाजच्या खेळात काय सुधारणा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.