The Great Indian Kapil Show : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांच्याशी २०२३ मध्ये लग्न केले. लग्न केल्यानंतर परिणीती संसारात रमली आहे. ती चित्रपटही करतेय, पण मनोरंजन विश्वातील कार्यक्रमांपासून दूर असते. आता, लग्नाच्या जवळपास दोन वर्षांनंतर परिणीती व राघव दोघेही द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसणार आहेत. पण या कार्यक्रमांचे शूटिंग त्यांना थांबवावे लागले. आयएएनएसच्या वृत्तानुसार, राघव याची आई आजारी पडल्याने त्यांना शूटिंग मध्येच थांबवावे लागले.
रिपोर्ट्स नुसार, राघव यांची आई द ग्रेट इंडियन कपिल शोच्या शूटिंग दरम्यान सेटवर उपस्थित होत्या. अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्या सेटवर अचानक थरथर कापू लागल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्याबरोबर परिणीती व राघवही गेले, त्यामुळे या एपिसोडचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. आता प्रोडक्शन टीम राघव आणि परिणीती यांच्याशी बोलून एपिसोड पुन्हा शूट करणार आहे. सध्या राघव यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
लग्नानंतर राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र हजेरी लावणार होते. पण द ग्रेट इंडियन कपिल शोचे शूटिंग सुरू असतानाच आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना जावं लागलं. आता राघव व परिणीती यांच्या वेळापत्रकानुसार शोचे शूटिंग पुन्हा केले जाईल.

द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आतापर्यंत आलेले पाहुणे
दरम्यान, कपिल शर्माच्या या कॉमेडी शोमध्ये आत्तापर्यंत सलमान खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, अनुराग बसू, फातिमा सना शेख, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, गौतम गंभीर, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, अभिषेक शर्मा, ऋषभ पंत, प्रतीक गांधी, जितेंद्र कुमार, अजय देवगण, मृणाल ठाकूर, विंदू दारा सिंग, संजय मिश्रा, रवी किशन, कुब्बरा सैत आणि दीपक डोबरियाल या पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.
परिणीती चोप्राच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंह चमकिला’ या चित्रपटात झळकली होती. लवकरच ती नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजचं शूटिंग सुरू आहे. या सीरिजमध्ये परिणीतीबरोबर ताहिर राज भसीन, जेनिफर विंगेट, हरलीन सेठी, चैतन्य चौधरी, सुमित व्यास आणि अनुप सोनी यांच्यासह अनेक कलाकारांचा आहेत. या सीरिजचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे, पण त्याचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप नेटफ्लिक्सने जाहीर केलेली नाही.