सोशल मीडियामुळे ट्रोलिंगचं प्रमाण खूपच वाढलं आहे. अनेक कलाकारांना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कधी कधी दोन कलाकारांमधील भांडणाबद्दल चाहते नावडत्या कलाकारावर टीका करतात. ते आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रेमापोटी दुसऱ्या कलाकाराचा अनादर करतात. मग त्या प्रेमापोटी ते अनेकदा दुसऱ्या कलाकारावर खालच्या थराला जाऊन टीका करायलाही कमी करीत नाहीत.

Rise And Fall या शोमधून बाहेर पडलेली अभिनेत्री आहाना कुमरा हिने असाच काहीसा अनुभव शेअर केला आहे. भोजपुरी अभिनेता व तिचा सहस्पर्धक असलेला पवन सिंहच्या चाहत्यांकडून तिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

अभिनेत्रीची आणि पवन सिंहची काही कारणावरून भांडणं झाली होती. त्याबद्दल शोमध्येच तिने त्याच्याबरोबरचे मतभेद मिटवले असले तरीही आहानाला ऑनलाइन ट्रोलिंग आणि टीकेचा सामना करावा लागला असल्याचं तिनं सांगितलं. या सगळ्या प्रकाराबद्दल अहानानं शोच्या निर्मात्यांकडे तक्रारही केली आहे.

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री आहाना कुमरा म्हणाली, “मी शोमधून बाहेर आल्यानंतर मला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या अनेक धमक्या मिळाल्या. मी तर कोणतंही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नव्हतं. मग मला अशा धमक्या का मिळत होत्या?” तिनं त्या सर्व मेसेजचे स्क्रीनशॉट शोच्या निर्मात्यांना पाठवले, असंही तिनं सांगितलं.

या त्रासाबद्दल पुढे आहाना म्हणाली, “माझं एकच वाक्य एवढं त्रासदायक का ठरतंय? आपण कोणत्या जगात जगतोय, असं वाटायला लागलंय. एका गोष्टीसाठी मला इतक्या धमक्या मिळतायत, माझ्याबद्दल इतक्या वाईट गोष्टी बोलल्या जातायत. हे खरंच धक्कादायक आहे.” तसंच “इतका राग का?” असा प्रश्न करीत तिनं याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

अहानानं स्पष्ट केलं की, शोमधील गैरसमज स्पष्ट होऊन विषय मिटवण्यात आला होता. तसंच तिनं पवनच्या चाहत्यांचा तिच्यावर राग असल्याचंही मान्य केलं. त्याबाबत ती म्हणते, “मला समजतं की, चाहते कधी कधी रागावतात, मी काहीतरी चुकीचं बोललं असेन; जे त्यांना खटकलं असेल. पण, त्यांच्याकडून धमक्या येणं हे योग्य नाही.”

आहाना कुमरा इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री आहाना कुमरा ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या गाजलेल्या सिनेमात दिसली होती. तसंच ती ‘इंडिया लॉकडाऊन’,’ कॉल माय एजंट’, ‘एजंट राघव’, ‘बेताल’ अशा काही सीरिजमध्येही झळकली आहे. तिनं सिनेमांमध्येही काम केलंय. अहाना शेवटची ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसली होती.