Salman Khan : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचा तिसरा सीझन नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोची घोषणा करण्यात आली. या नवीन सीझनमध्ये नवज्योत सिंग सिद्धू हेदेखील पाहायला मिळणार आहेत. या आगामी तिसऱ्या सीझनमध्ये नवज्योत सिंग सिद्धूदेखील जवळपास पाच वर्षांनी परीक्षक म्हणून येत आहेत.

कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात बॉलीवूड अभिनेता सलमान खान पाहुणा म्हणून उपस्थित असणार आहे. काही दिवसांपूर्वी शोसंबंधित एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये सलमान खानने घटस्फोट, लग्न आणि घटस्फोट झाल्यानंतरची पोटगी यावर केलेल्या वक्तव्याची झलक पाहायला मिळाली होती. अशातच या शोमध्ये त्याने आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमिर खानची याआधीची दोन लग्न आणि त्याच्या आयुष्यात नुकत्याच सुरू झालेल्या नवीन नात्याबद्दल सलमानने मिश्कील वक्तव्य केलं आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये कपिल शर्मा सलमानला म्हणतो, “आमिर खानने नुकतंच चाहत्यांना त्याच्या नवीन प्रेयसीची ओळख करून दिली, ते थांबतच नाहीय आणि तुम्ही काही करतच नाहीय.”

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटबद्दल सलमान खानची मिश्कील टिप्पणी

यावर सलमान मिश्कीलपणे असं म्हणतो, “आमिरची गोष्टच वेगळी आहे. तो एक परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत तो परफेक्ट लग्न करत नाही तोपर्यंत…” सलमानच्या या वाक्यानंतर कपिलसह अर्चना पूरण सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धू जोरजोरात हसू लागतात. सलमानने हे वाक्य मस्करीत म्हटलं असलं तरी त्याच्या या विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेकांनी या प्रोमोवर तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल सांगायचं झालं तर यात नवज्योत सिंग सिद्धू, अर्चना पूरण सिंह आणि कपिल शर्मा यांच्याबरोबरच सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदासारखे विनोदी कलाकारदेखील आहेत. येत्या २१ जून रोजी रात्री ८ वाजता शोचा पहिला भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.