‘स्कॅम १९९२ – द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली. हर्षद मेहताच्या स्कॅमबद्दल खूप बारकाईने या वेबसीरिजमध्ये गोष्टी मांडण्यात आल्या. लोकांनीसुद्धा या वेबसीरिजला डोक्यावर घेतलं. खासकरून यात हर्षद मेहताचं पात्र साकारणारा अभिनेता प्रतीक गांधी हा रातोरात स्टार झाला. या वेबसीरिजमधील त्याचे डायलॉगसुद्धा प्रचंड गाजले. याच सीरिजमध्ये हर्षद मेहताच्या भावाची म्हणजेच आश्विन मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

या वेबसीरिजमध्ये हर्षद मेहता याचा भाऊ आश्विन मेहता यांची भूमिका हेमंत खेर यांनी साकारली आहे. सध्या त्यांच्याकडे काम नसून त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन काम मिळवण्यासाठी विनंतीपर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. एवढ्या मोठ्या वेबसीरिजमध्ये काम करूनही हेमंत यांच्यावर अशी वेळ आल्याचा बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे.

आणखी वाचा : जेव्हा राहुल गांधींनी राजकारण्यांसाठी शाहरुख खानकडे मागितलेला सल्ला; किंग खान म्हणाला…

१३ एप्रिल रोजी हेमंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून काम मिळावे यासाठी एक पोस्ट केली. या ट्वीटमध्ये हेमंत लिहितात की, “लेखक, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर आणि निर्मात्यांना नम्र विनंती. कृपया तुमच्या कथा, चित्रपट, मालिका आणि लघुपटांमध्ये काही काम असल्यास मला संधी द्या. मी एक अभिनेता म्हणून स्वतःला मला आणखी एक्सप्लोर करायचं आहे. त्यामुळे काही काम असल्यास एक अभिनेता म्हणून माझी दखल घ्या.”

हेमंत खेर यांची ही पोस्ट पाहून त्यावर बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं आहे. याबरोबरच प्रतिथयश लेखक आमिल कियान खान यांनीही हेमंत यांच्या पोस्टची दखल घेत त्यांची नोंद केल्याचं ट्वीट करत सांगितलं आहे. आमिल हे अजय देवगणबरोबर बरंच काम करतात. नुकताच आलेला ‘भोला’ आणि ‘रनवे ३४’ या चित्रपटासाठी त्यांनी सहलेखक म्हणून काम केलं आहे.

आणखी वाचा : सानिया मिर्झाने एमसी स्टॅनला दिलेल्या खास भेटवस्तूची किंमत ऐकून व्हाल थक्क; चाहत्यांनीही केलं कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंत यांनी सलमान खान प्रोडक्शनच्या ‘नोटबुक’ या चित्रपटात मुख्याध्यापकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर त्यांना ‘स्कॅम १९९२’मध्ये चांगलाच ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी नेटफ्लिक्स आणि प्राइमच्या काही छोट्या वेबसीरिजमध्ये काम केलं, पण गेले काही दिवस त्यांच्याकडे काहीच काम नसल्याने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. फक्त हेमंतच नव्हे तर याआधी नीना गुप्ता यांनाही काम मिळवण्यासाठी असाच सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला होता.