बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता अन् दिग्दर्शक करण जोहर हा चांगलाच चर्चेत असतो. नुकतंच करणने तब्बल ८ वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शक म्हणून जबरदस्त कमबॅक केलं. याबरोबरच करण हा त्याच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’साठीही ओळखला जातो. नुकताच या चॅट शोचा आठवा सीझन सुरू झाला असून वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये नव्या एपिसोडमध्ये आता पतौडी घराण्यातील सूनबाई व ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचा मोठा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसह हजेरी लावली. नुकताच या भागाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नव्या भागात शर्मिला टागोर आणि सैफ अली खान यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

या एपिसोडदरम्यान शर्मिला यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाबद्दल भाष्य केलं. या चित्रपटात शर्मिला यांना शबाना आजमी यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. करण जोहरने आपल्या या शोमध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली. करण म्हणाला, “मी रॉकी और रानीमधील शबाना आजमी यांच्या भूमिकेसाठी शर्मिला यांना विचारलं होतं. परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या या भूमिकेसाठी होकार देऊ शकल्या नाहीत, ही खंत कायम माझ्या मनात राहील.”

आणखी वाचा : ‘सौदागर’नंतर गोविंद नामदेव यांनी कधीच सुभाष घईंबरोबर काम केलं नाही; अभिनेत्याने सांगितलं नेमकं कारण

यावर शर्मिला टागोर म्हणाल्या, “ही सगळी गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा कोविडची सर्वात जास्त साथ सुरू होती. तेव्हा आपण कोविडविरोधात झुंज देत होतो, त्यासाठीची लसदेखील तेव्हा बाहेर आली नव्हती अन् आम्ही कुणीच इतर लसही घेतली नव्हती. अन् माझ्या कॅन्सरनंतर एवढा मोठा धोका पत्करायला माझ्या घरचेही तयार नव्हते.” या शोदरम्यान शर्मिला यांनी प्रथमच आपल्याला झालेल्या ‘कॅन्सर’बद्दल भाष्य केलं.

शर्मिला टागोर यांचं हिंदी आणि बंगाली चित्रपटातील योगदान अतुलनीय आहे. १९६८ मध्ये त्यांनी मंसूर आली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं. २०११ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना सैफ, सोहा आणि सबा अशी तीन मुलं आहेत. सैफ आणि सोहा हे अभिनय क्षेत्रातच कार्यरत आहेत. शर्मिला यांनी नुकतंच मनोज बाजपेयी यांच्यासह ‘गुलमोहर’ या डिज्नी प्लस हॉटस्टारच्या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं.

Story img Loader