सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांना ओटीटीवर खूप पसंती मिळतेय. काही चित्रपटांच्या कथा, त्यातील सस्पेन्स तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. कलाकारांनी उत्तम अभिनय केला की भीती, रहस्यांनी भरलेले हे चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. असाच एक दमदार क्राइम, सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा आहे. त्याचं नाव ‘रक्षासुदू’ (Rakshasudu on OTT).
‘रक्षासुदू’ सहा वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. हा चित्रपट लोकप्रिय तमिळ चित्रपट ‘रत्सासन’चा अधिकृत रिमेक आहे. या सिनेमात तेलुगू प्रेक्षकांसाठी काही बदल करण्यात आले होते. या सिनेमात पोलीस तपास व मुख्य अभिनेत्याचा भावनिक प्रवासही दाखवण्यात आला आहे.
‘रक्षासुदू’ चित्रपटाची कथा
‘रक्षासुदू’ या चित्रपटाची कथा अरुणची आहे. त्याचं स्वप्न थ्रिलर चित्रपट बनवायचं असतं. पण वडिलांच्या निधनानंतर तो आपलं स्वप्न मागे सोडून पोलीस अधिकारी होतो. रुजू झाल्यावर त्याच्यासमोर पहिलेच प्रकरण एका सिरियल किलरचे येते. तो लहान मुलींचे निर्घृण खून करत असतो. अरुण त्याच्या चित्रपट निर्मितीच्या अनुभवाच्या आधारे खून करणाऱ्याची सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान, त्याला अनेक आव्हानं येतात, या आव्हानांमध्येच सस्पेन्स दडलेला असतो.
‘रक्षासुदू’ या चित्रपटाचा बॅकग्राउंड स्कोअर व सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. त्याने या सिनेमाच्या सस्पेन्समध्ये भर पडते. दिग्दर्शक रमेश वर्मा यांनी ओरिजनल चित्रपटाच्या धर्तीवर तेलुगू प्रेक्षकांसाठी हा सिनेमा तयार केला. बेल्लमकोंडा साई श्रीनिवास पहिल्यांदाच या चित्रपटात गंभीर भूमिकेत झळकला.
चित्रपटातील कलाकार
‘रक्षासुदू’ या चित्रपटात साई श्रीनिवास मुख्य भूमिकेत आहे. अनुपमा परमेश्वरन, राजीव कनकला, सरवनन, विनय राय व सुजन या कलाकारांनाही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. घिबरनच्या दमदार बॅकग्राउंड म्युझिकने चित्रपट आणखी प्रभावी केला आहे. या सिनेमाचं एडिटिंग अमर रेड्डीने केलं होतं. चित्रपटाची निर्मिती पेन मूव्हीजने केली होती.
IMDb रेटिंग किती? कुठे पाहायचा चित्रपट?
‘रक्षासुदू’ हा चित्रपट २०१९ मध्ये आला होता. ‘रक्षासुदू’ हा २ तास २ मिनिटांचा चित्रपट आहे. ‘रक्षासुदू’ हा तमिळ चित्रपट ‘रत्सासन’चा तेलुगू रिमेक आहे. या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांचाही याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयएमडीबीवर ‘रक्षासुदू’ला ७.९ रेटिंग मिळालं. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो ZEE5 वर पाहू शकता. तसेच तो हिंदीमध्ये ओटीटीवरही उपलब्ध आहे.