Watch These Movies Of Veteran Actor Dharmendra On OTT : धर्मेंद्र बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. आजवर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पण, तुम्हाला माहीत आहे का त्यांचे काही चित्रपट आहेत, जे सध्या ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

धर्मेंद्र यांनी अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं. त्यांनी त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांच्याबरोबर अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. येत्या काळात ते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातूनही झळकणार आहेत. अशातच आम्ही तुम्हाला सध्या त्यांचे ओटीटीवर उपलब्ध असलेले चित्रपट कोणते याची यादी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात…

धर्मेंद्र यांचे ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध

तुम हसीन मैं जवान – हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर १.४५ कोटी इतकी कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही आता ‘अमॅझॉन प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.

शोले – १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. आताच्या पिढीतील प्रेक्षकही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. यामध्ये अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, अमजद खान आणि जया बच्चन या कलाकारांनी काम केलं आहे. तर उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १५ कोटींची कमाई केलेली. हा चित्रपट तुम्ही ‘अमॅझॉन प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.

लोफर – १९७३ मध्ये प्रदर्शित झालेला धर्मेंद्र व मुमताज यांचा ‘लोफर’ हा एक रोमँटिक-ड्रामा आणि अॅक्शन असलेला चित्रपट आहे. यामध्ये धर्मेंद्र यांनी रंजीत नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर २.२५ कोटी इतकी कमाई केलेली. हा चित्रपट तुम्ही आता ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.

कहानी किस्मत की – ‘कहानी किस्मत की’ हा एक अॅक्शन चित्रपट आहे. यामध्ये धर्मेंद्र मुख्य भूमिकेत असून त्यांच्याबरोबर अभिनेत्री रेखा झळकलेल्या. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २.५ कोटी इतकी कमाई केली होती. हा चित्रपट त्याकाळी हिट ठरला होता. सध्या तुम्ही हा चित्रपट ‘सोनी लीव्ह’वर पाहू शकता.

राजा जानी – ‘राजा जानी’ हा १९७२ सालचा रेट्रो कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शन पाहायला मिळते. या चित्रपटातील धर्मेंद्र यांच्या स्टाइलिश आउटफिटची खूप चर्चा रंगली होती. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २.५ कोटी कमावले होते आणि आता हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.

यादों की बारात – ‘यादों की बारात’ हा एक अॅक्शन-ड्रामाने भरलेला चित्रपट आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २.७५ कोटी इतकी कमाई केलेली. हा चित्रपट तुम्ही ‘झी ५’वर पाहू शकता.

दोस्त – १९७४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. धर्मेंद्र यांच्या या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर २.५ कोटी इतकी कमाई केलेली. हा चित्रपट आता तुम्ही ‘अमॅझॉन प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.

इन्सानियत के दुश्मन – ‘इन्सानियत के दुश्मन’ हा चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये धर्मेंद्र यांच्याबरोबर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि राज बब्बर हे कालाकारही झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४.२५ कोटींचा गल्ला जमवलेला. हा चित्रपटही तुम्ही ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.

यमला पगला दिवाना – ‘यमला पगला दिवाना’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासाठी खास ठरतो, कारण यामध्ये त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओलनेही काम केलं आहे. २०११ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५.२८ कोटी कमावले होते. हा चित्रपट तुम्ही ‘झी ५’वर पाहू शकता.

तहलका – १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अॅक्शन पाहायला मिळते. अनिल शर्मा यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे आणि धर्मेंद्र यांच्याबरोबर यामध्ये नसीरुद्दीन शाह, आदित्य पांचोली आणि अमरीश पुरी हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाने ५.७५ कोटी इतकी कमाई केलेली. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.