अभिनेत्री सुश्मिता सेन गेले अनेक दिवस तिच्या आगामी ‘ताली’ या वेब सीरिजमुळे खूप चर्चेत आहे. ‘ताली’ ही वेब सीरिज येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिरीजचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता त्यानंतर या सिरीजचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘ताली’ ही वेब सिरीज तृतीय पंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिरीज मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन गौरी सावंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता प्रदर्शित झालेला ट्रेलरमध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका कोण साकारणार हेही समोर आलं आहे.

आणखी वाचा : Video: सुश्मिता सेन अन् तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा आले एकत्र? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

गेले अनेक दिवस सर्वजण या सिरीजच्या ट्रेलरची वाट बघत होते. तर आज प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून गौरी सावंत यांच्या बालपणीपासून आत्तापर्यंत असा जीवन प्रवास उलगडला गेला आहे. या ट्रेलरची सुरुवात त्यांच्या लहानपणापासून होते. त्यांच्या लहानपणीची भूमिका अभिनेत्री कृतिका देव हिने साकारली आहे. तर गौरी सावंत यांना लहानपणापासूनच कसा संघर्ष करावा लागला आणि आज त्यांनी समाजात मिळवलेलं स्थान हे सर्व या ट्रेलरमधून उलगडत आहे.

हेही वाचा : २९ वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; खास फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

या वेब सीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर याचं लेखन क्षितीज पटवर्धनने केलं आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित केली जाणार आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असतील, असं बोललं जात आहे. आता या सिरीजच्या ट्रेलरवर नेटकरी कमेंट करत या सिरीजसाठी प्रचंड उत्सुकता दर्शवत आहेत.