Movies To Watch On Children’s Day : बॉलीवूडमध्ये लहान मुलांवर आधारित अनेक चित्रपट आहेत. चिल्ड्रन डे निमित्त तुम्हाला घरी राहून मुलांबरोबर छान वेळ घालवायचा असेल तर एकत्र बसून चित्रपट पाहणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळेच बालदिनानिमित्त आम्ही तुम्हाला लहान मुलांवर आधारित चित्रपटांची नावं सांगणार आहोत.

उद्या १४ नोव्हेंबर रोजी चिल्ड्रन डेनिमित्त तुम्ही कोणते चित्रपट घरबसल्या तुमच्या मुलांबरोबर पाहू शकता आणि त्यात कोणते कलाकार आहेत हे जाणून घेऊयात. यामध्ये आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ ते ‘दंगल’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

I Am Kalam – नील माधब पंडा यांच्या ‘आएम कलाम’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ही गोष्ट एका अशा मुलाची आहे, ज्याला काही करून इंग्रजी शिकायची असते, त्याला शाळेत जायचं असतं, मोठं होऊन कुटुंबाचा आधार व्हायचं असतं. यामधून मुलांना खूप काही शिकायला मिळतं. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमझॉन प्राइम’वर पाहू शकता.

तारे जमीन पर – ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट मुलांसह त्यांच्या पालकांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की प्रत्येक मूल खास असतं. प्रत्येक मुलामध्ये काही न काही चांगली गोष्ट असतेच. यामध्ये आमिर खान व दर्शील सफारी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट तुम्ही ‘नेटफ्लिक्स’वर पाहू शकता.

Nil Battey Sannata – ‘नील बट्टे सन्नाटा’ हा चित्रपट गरीब परिस्थिती असलेल्या आई व मुलीवर आधारित आहे. या चित्रपटात स्वप्न किती महत्त्वाची असतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही ‘झी ५’ वर पाहू शकता.

Chillar Party – ‘चिल्लर पार्टी’ हा एक मजेदार चित्रपट आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर बसून हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमझॉन प्राइम’वर पाहू शकता.

दंगल – आमिर खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आजही या चित्रपटाबद्दल अनेकदा बोललं जातं. यामध्ये एक वडील त्यांच्या चार मुलींना कुस्ती खेळायला शिकवतात आणि त्या पुढे जाऊन देशासाठी अभिनास्पद कामगिरी करतात. यातून मुली कुठल्याही क्षेत्रात ठरवलं तर यश मिळवू शकतात असंही पाहायला मिळतं, त्यामुळे हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. हा सिनेमा तुम्ही ‘ॲमझॉन प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.

सितारे जमीन पर – आमिर खान व जिनिलिया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपटही प्रेरणादायी ठरतो, त्यामुळे बालदिनानिमित्त तुम्ही हा चित्रपट यूट्यूबवर घरबसल्या तुमच्या मुलांबरोबर पाहू शकता.

Stanley ka Dabba – अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनाने भरलेला असला तरी हा एक भावनिक चित्रपट आहे. मुलांबरोबर एकत्र बसून पाहण्यासाठी हा एक चांगला चित्रपट आहे. हा सिनेमा तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.