बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘The Ba***ds of Bollywood’ ही सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवरील या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सीरिजसह त्यातील एका सीनचीसुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्यासारखा एक माणूस आहे, ज्याबद्दल स्वत: समीर वानखेडेंनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात धाव घेतली होती.
The Ba***ds of Bollywood मधील या दृश्यावर आक्षेप घेत समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी असा आरोप केला की, सीरिजमधील एका विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या वादावर आता सीरिजमध्ये वानखेडेंसारख्या पात्राची भूमिका करणारा अभिनेता आशीष कुमारने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आशीष कुमारने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो, “तुम्ही The Ba***ds of Bollywood पाहिली असेल. त्यात मी COP ची भूमिका केली आहे. मी फक्त माझं काम केलं. व्हिडीओसाठी मला उशीर झाला, कारण माझी प्रकृती बरी नव्हती. मला काहीही करून हा व्हिडीओ करायचाच होता. रेड चिलीस एंटरटेनमेन्ट, आर्यन खान यांचे आभारी. आर्यन आणि माझ्यात फक्त सीनबद्दल बोलणं व्हायचं. आम्ही इतर गप्पा मारायचो नाही. सुरुवातीपासून माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आशा आहे प्रेक्षकांना हा सीन आवडला असेल. भविष्यातही मी असं काम करेन असा विश्वास माझ्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो, पुन्हा एकदा धन्यवाद.”
आशिष कुमार इन्स्टाग्राम व्हिडीओ
दरम्यान, या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी आशीष कुमारचं कौतुक केलं आहे. सीरिजमध्ये तुझी भूमिका लहान असली तरी ती तितकीच प्रभावशाली असल्याचं एका चाहत्याने म्हटलं आहे, तर आणखी एकाने तू खऱ्या पोलिस अधिकाऱ्यासारखाच दिसला आहेस”, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सीरिजमधील या सीनमध्ये संबंधित अधिकाऱ्याचं नाव कुठेही स्पष्टपणे दिलं गेलेलं नाही. शेवटच्या क्रेडिटमध्ये त्याला फक्त ‘प्लेन क्लोथ कॉप’ (सामान्य कपड्यांतील पोलिस) असं म्हटलं आहे.
या सीनवर आक्षेप घेत समीर वानखेडेंनी आर्यन खान, शाहरुख खान आणि नेटफ्लिक्स यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला. या सीरिजमधील त्याचं चित्रण चुकीचं आणि अपमानजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.