The Bengal Files OTT Release Date : अलीकडे अनेक प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांत जाण्याऐवजी घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहणं पसंत करतात. ओटीटीमुळे प्रेक्षकांना बसल्या जागी जगभरातील विविध कलाकृतींचा आनंद घेण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये बघता न आलेले सिनेमे ओटीटीवर येण्याची वाट पाहत असतात. या महिन्यात अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अशातच बहुचर्चित ‘द बंगाल फाईल्स’ हा सिनेमादेखील ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ सप्टेंबरला त्यांचा नवा चित्रपट ‘द बंगाल फाईल्स’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला, आणि आता हा चित्रपट लवकरच ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकीय इतिहासावर आधारित आहे.

‘द बंगाल फाईल्स’ हा राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित हिंदी चित्रपट आहे. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची काही ठिकाणी प्रशंसा झाली, तर काही ठिकाणी सिनेमावर टीका करण्यात आली होती. अशातच आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. ‘द बंगाल फाईल्स’ ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘द बंगाल फाईल्स’ कुठे आणि केव्हा पाहता येईल?

विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ पासून झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर आता घरबसल्या पाहण्याची ही उत्तम संधी आहे. झी-5 च्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चित्रपटाचं नवीन पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ‘दखल घ्यायलाच हवी अशी कहाणी… बंगालच्या इतिहासातील सत्यकथेला जाणून घेण्यासाठी तयार व्हा…’ अशी कॅप्शन देत सिनेमाची ओटीटी रिलीजची माहिती प्रेक्षकांना देण्यात आली आहे.

दरम्यान, ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि सिम्रत कौर यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.