The Family Man 3 Trailer : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी माध्यमावरील सर्वांच्या आवडत्या वेब सीरिजमध्ये द फॅमिली मॅन. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही सीझन्सला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. त्यानंतर या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा झाली. ही घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांना या आगामी तिसऱ्या सीझनची उत्सुकता लागून राहिली होती. ही उत्सुकता आता संपली आहे.
‘द फॅमिली मॅन ३’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे आणि या सीझनमधून प्रेक्षकांना श्रीकांत तिवारी (मनोज बाजपेयी) पुन्हा एकदा एका नव्या आणि थरारक मिशनवर घेऊन जाणार आहे. या सीझनमध्येही श्रीकांत आपल्या गुप्तहेराच्या धोकादायक कामगिरी आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या यांच्यात तोल सांभाळताना दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक मजेशीर प्रसंग आहे. श्रीकांत आपल्या कुटुंबाला अखेर सांगतो की तो एक गुप्तहेर आहे. यावर त्याचा अतरंगी मुलगा गमतीत विचारतो, “बाबा, तुमचं कोड नेम ‘टायगर’, ‘पँथर’ की ‘लायन’ असं काही आहे का?” त्यावर श्रीकांत नेहमीच्या विनोदी अंदाजात म्हणतो, “मी इंटेलिजन्समध्ये काम करतो, सर्कसमध्ये नाही!”
यानंतर कथा भारताच्या ईशान्य भागात वळते, जिथे श्रीकांतसमोर एक नवा आणि भयंकर शत्रू उभा राहतो. जयदीप अहलावत साकारत असलेला ड्रग लॉर्डशी श्रीकांत तिवारी सामना करणार आहे. त्याच्यासह निमरत कौरसुद्धा दिसत आहे, जी ट्रेलरमध्ये “ही सर्कस मीच चालवते” असं अगदी ठामपणे म्हणताना दिसतेय. पुढे थरार आणखी वाढतो, जेव्हा श्रीकांत स्वतःच ‘वाँटेड क्रिमिनल’ ठरतो आणि त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट निघतं. या वेळेस परिस्थिती अधिक गंभीर होते. तो केवळ मिशनमध्येच नाही, तर आपल्या कुटुंबालाही या गुप्त कारवायांमध्ये सामील करून घेताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे.
श्रीकांतची ही थरारक कहाणी JK तळपदे (शरीब हाशमी) शिवाय अपुरीच आहे. तिसऱ्या सीझनच्या या ट्रेलरमध्ये हे दोघे पुन्हा एकदा तुरुंगात अडकल्याचे दिसत आहे. याचदरम्यान, त्यांच्यातला एक मजेशीर संवादही या ट्रेलरमध्ये आहे. JK वैतागून श्रीकांतला म्हणतो, “तुझ्यामुळे मी आयुष्यभर अविवाहित राहीन असं वाटतंय.” त्यावर श्रीकांत पटकन प्रत्युत्तर देतो, “आपण इथून बाहेर पडलो की मी स्वतःच तुझं स्वयंवर करतो.”
मनोज बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन ३’चा ट्रेलर
मनोज बाजपेयीचा हा फॅमिली मॅन पुन्हा प्रेक्षकांच्या मनात आपलं घर करणार असं या ट्रेलरवरून तरी पहायला मिळत आहे. गुप्तहेर म्हणून त्याचा बाहेरच्या शक्तींशी चाललेला संघर्ष, कुटुंबातले वाद आणि JK बरोबरची हटके मैत्री, यामुळे हा सीझनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार इतकं नक्की…
दरम्यान, सुमन कुमार, राज आणि डी. के. लिखित ‘फॅमिली मॅन ३’ येत्या २१ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी, जयदीप अहलावत, निमरत कौर, शरीब हाशमीसह श्रेया धन्वंतरी, दर्शन कुमार, सीमा बिस्वास, विपिन शर्मा, गुल पनाग, दिलीप ताहिल, जुगल हंसराज आणि आदित्य श्रीवास्तव अशी दमदार कलाकारांची फौज आहे.
