Andhar Maya Series : कोकणातील खातू कुटुंबीय अंतिम विधी कार्यासाठी पूर्वजांच्या वाड्यात एकत्र येतात. आपल्या घरी परत येणं प्रत्येकासाठी सुखद असतंच असं नाही आणि काही दरवाजे तर न उघडलेलेच बरे असतात. या वाड्यात सगळे कुटुंबीय पुन्हा भेटतात पण, इथेच एका अनपेक्षित प्रवासाची सुरुवात होते.

कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे समोर येतात आणि बघता-बघता या वाड्यात काही विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. या कुटुंबातले सदस्य हळुहळू वाड्यातून गायब व्हायला लागतात. आता हा वाडा खरंच पछाडलेला असतो का? की हा वाडा स्वतःचं अस्तित्व परत मिळवतोय…याठिकाणी नेमकं भयावह काय घडतंय? याचा उलगडा प्रेक्षकांसमोर ‘अंधार माया’ या हॉरर सीरिजद्वारे होणार आहे.

‘अंधार माया’ ही हॉरर सीरिज Zee5 वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा अंगावर काटा आणणारा थरारक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘अंधार माया’चं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी केलं आहे. तर, लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.

‘अंधार माया’ या सीरिजची कथा व संवाद प्रल्हाद कुडतरकर यांनी लिहिले आहेत. तर, या सीरिजची पटकथा कपिल भोपटकर यांची आहे. दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेले अभिनेते किशोर कदम या सीरिजमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. रहस्य, गूढमय वातावरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सीरिजचा प्रीमियर ३० मे रोजी Zee 5 वर होणार आहे.

दरम्यान, या सीरिजमध्ये किशोर कदमसह ऋतुजा बागवे, शुभंकर तावडे, ओमप्रकाश शिंदे, स्वप्नाली पाटील, अनुप बेलवलकर अशा लोकप्रिय कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सीरिजमध्ये पाहायला मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एरिकॉन टेलिफिल्म्सचे निर्माते शर्मिष्ठा राऊत व तेजस याबद्दल म्हणाले, “अंधारमाया ही सीरीज आमच्यासाठी खूप खास आहे. यात भावना, रहस्य आणि मानवी सत्यावर आधारित असलेली गोष्ट मांडण्यात आली आहे. निर्माते या नात्याने मराठीत अशाप्रकारची लक्षणीय सीरिज Zee5 सारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर लॉन्च होणं समाधानकारक आहे. प्रेक्षकांनी अंधार माया सीरीज पाहावी.”