बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांचं पाकिस्तानस्थित असलेलं वडिलोपार्जित घर खरेदी करण्यासाठी खैबर पख्तूनख्वा प्रांत सरकराने परवानगी दिलीय. ‘कपूर हवेली’ नावावे प्रसिद्ध असेलेल्या घराचं संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. पेशावरचे जिल्हा आयुक्त कॅप्टन खालिद महमूद यांनी घरमालकांकडून घर खरेदीसाठी दाखल केलेली हरकत फेटाळली आहे आणि दोन्ही घरं पुरातत्व विभागाला सुपूर्द करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

जिल्हा आयुक्त कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या नोटीसनुसार, दिवंगत अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या घराची जमीन ही अधिग्रहण करण्यात येणाऱ्या विभागाच्या म्हणजेच पुरातत्व विभागाच्या नावावर करण्यात येईल.

खैबर पख्तूनख्वा सरकारने १ हजार ७०१ स्क्वेअर फुटाचं राज कपूर यांचं आणि १ हजार ८९ स्क्वेअर फुटाचं दिलीप कुमार यांच्या घरासाठी अनुक्रमे १.५० कोटी आणि ८० लाख इतकी किंमत ठरवली आहे. पण घरांसाठी ठरवलेल्या किंमतीवरून दोन्ही घरमालक नाराज होते. राज कपूर यांच्या घराचे मालक अली कादिर यांनी २० कोटींची मागणी केली होती. तर दिलीप कुमार यांच्या घराचे मालक गुल रहमान मोहम्मद यांनी हवेलीला मार्केट रेट नुसार जवळपास ३.५० कोटी इतकी रक्कम ठरवण्यासाठी सांगितलं होतं.

ही हवेली पेशावर शहराच्या मधोमध किस्सा ख्वानी बाजारात आहे. ही हवेली राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली होती. राज कपूर आणि त्यांचे चुलते त्रिलोक कपूर यांचा याच हवेलीत जन्म झाला आहे.

Kapoor Haveli

गेल्याच महिन्यात खैबर-पख्तूनख्वाच्या प्रांत सरकारच्या पुरातत्व विभागाने तब्बल २.३० कोटी रूपये इतकी रक्कम पेशावरच्या उपायुक्तांकडे दिली आहे. खैबर पख्तूनख्वाचे पुरातत्व विभागाचे संचालक अब्दुल समद यांनी सांगितलं की, लवकरात लवकर दोन्ही घरांना पुरातत्व विभाग ताब्यात घेऊन या हवेलीची सध्याची झालेली अवस्था दुरुस्त करून ज्या रचनेत आधी ही हवेली होती त्याच रचनेत नव्याने डागडुजीचं काम सुरू करण्यात येईल.

दोन्ही घरमालक हवेलीला तोडून त्या जागी एक कमर्शिअल प्लाझा बांधण्याच्या प्रयत्नात होते. पण त्यांच्या या प्रयत्नांना थांबवून पुरातत्व विभागाने या ठिकाणी संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. फिल्म इंडस्ट्रीत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल लोकांना माहिती मिळावी यासाठी खैबर पख्तूनख्वाचं सरकार या दोन्ही हवेलीचं रूपांतर ऐतिहासिक इमारतीत करुन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे.