‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक मोठ्या कलाकारांना येथे सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री काजोलची विशेष छाप पडली. मुंबईत आयोजित या सोहळ्यात काजोलचा मराठी बाणा दिसून आला. राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं काजोलला गौरवण्यात आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काजोलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना, काजोलनं सर्वप्रथम मराठीतून सगळ्यांना अभिवादन केलं. सुमारे ३ दशकं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या काजोलला, राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार, महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच अनुपम खेर आणि मुक्ता बर्वे यांनाही गौरवण्यात आलं.

कार्यक्रम संपल्यानंतर काजोलनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान तिनं मराठीत उत्तर दिलं आणि गौरवाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्याच वेळी तिला जेव्हा हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ती भडकली अन् म्हणाली, “अब मैं हिंदी में बोलू??? जिसको समझना है, वो समझ लेंगे.” असं सांगत उत्तर देण्यास नकार दिला. काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काजोल म्हणाली, “सर्वांना नमस्कार, आज माझा वाढदिवस आहे आणि मी इथे या मंचावर इतक्या मोठ्या लोकांबरोबर उभी आहे. अनुपम खेर यांनी माझ्यासाठी खूप चांगलं भाषण केलं आहे. त्यानंतर मी काय बोलणार. माझ्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे. माझी आई आज येथे माझ्याबरोबर बसली आहे. मी तिचीच साडी नेसली आहे. हा पुरस्कार माझ्याआधी तिला मिळाला होता. मला माझ्या वाढदिवसाला यापेक्षा मोठा पुरस्कार मिळू शकत नव्हता.” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिने तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. याच कारणास्तव काजोलचं नाव सतत चर्चेत आहे. ती पहिल्यांदाच वादात अडकताना दिसत नाही. याआधीही ती अनेक वादांचा भाग राहिली आहे. जर आपण तिच्या अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर, या वर्षी काजोल दोन चित्रपटांमध्ये दिसली आहे, त्यापैकी एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर ‘माँ’ होता, जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. तर ‘सरजमीन’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.