Parineeti Chopra And Raghav Chadha Announce Pregnancy : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावते. त्यांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. परिणीती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. परिणीतीने आता तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच आई-बाबा होणार आहेत. परिणीतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. या पोस्टमध्ये, चिमुकल्याच्या पायांचे ठसे दिसत आहेत. एक केक आणि त्याच्यावर १+१=३ असं लिहिलं आहे. तसेच परिणीती आणि राघव चालताना दिसत आहेत. या पोस्टला तिने,”आमचे छोटेसे जग… त्याच्या मार्गावर” असे कॅप्शन दिले आहे. परिणीतीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या गुडन्यूजनंतर चाहत्यांबरोबरच बॉलीवूडमधील अनेक मंडळी तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
नुकतीच ही जोडी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्यात. या दोघांना कपिल शर्माने अनेक विषयावर बोलायला लावलं. दोघांना कपिलनं प्रश्न केला की, बेबी प्लॅनिंग करणार आहात का? त्यावर राघव यांच्या उत्तरानं सर्व जण अवाक झाले होते.
कपिल शर्मानं परिणीती आणि राघव यांना प्रश्न केला की, तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय? त्यावर ते दोघे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. तेवढ्यात राघव हसत म्हणाले की, “देऊ… तुम्हा सर्वांना लवकरच आम्ही आनंदाची बातमी देऊ” हे उत्तर ऐकताच परिणीती थोडीशी शॉक झाली. ती आश्चर्याने राघव यांच्याकडे पाहू लागली. ती काही काळ गोंधळलेली होती. नंतर तिलाही हसू आलं.
परिणीती चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं २०२३ रोजी राजकारणी राघव चड्ढा यांच्याशी लग्न झालं. ‘ई-टाइम्स’च्या एका विशेष रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एकत्र शिक्षण घेतलं आहे. दोघांची पंजाबमध्ये भेट झाली. परिणीती तिथे शूटिंग करत होती, तेव्हा दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.