‘थप्पड’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता पवैल गुलाटी आता एका नव्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. लवकरच तो बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात दिसणार आहे. कोणता आहे तो चित्रपट, काय असेल त्याची भूमिका…जाणून घेऊया.
अभिनेता पवैल गुलाटी लवकरच दिग्दर्शक विकास बहलच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अमिताभ यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांची निर्मिती असणार आहे. या चित्रपटात अमिताभ, पवैल यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानाही दिसणार आहे. पवैलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे. त्याने गुडबाय हा चित्रपट आपल्यासाठी खास असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारासोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणं ही खूप खास संधी असल्याचं त्याने म्हटलं आहे. पवैलने यापूर्वीही अमिताभ यांच्यासोबत काम केलं आहे. २०१४ साली ‘युध’ या टीव्ही शोमध्ये ते एकत्र दिसले होते.
या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ताही दिसणार आहेत. त्या अमिताभ यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत. ह्या चित्रपटाची कथा एका अंत्ययात्रेच्या भोवती फिरते. अमिताभ यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं असल्याचं नीना यांनी सांगितलं होतं.
आणखी वाचाः “माझं एक स्वप्न पूर्ण झालं”- नीना गुप्ता; जाणून घ्या त्या स्वप्नाबद्दल!
हा चित्रपट पवैलचा बालाजी टेलिफिल्म्ससोबतचा दुसरा चित्रपट असणार आहे. त्याने नुकताच अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ हा चित्रपट पूर्ण केला आहे.