Pawan Kalyan On Hari Hara Veera Mallu Movie : गेल्या काही वर्षांत भारतीय सिनेमांमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट आल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘शहंशाह बाबर’ (१९४४), ‘हुमायूं’ (१९४५), ‘बैजू बावरा’ (१९५२), ‘मुघल-ए-आझम’ (१९६०) व ‘जोधा अकबर’ (२००८) यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून मुघलांचे वैभव आणि त्यांच्या प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. मात्र, त्याच काळात भारतातील चोल, गुप्त, मौर्य व सातवाहन – यांच्यावर आधारित सिनेमे आले नसल्याचं चित्र पाहायला मिळतं.

याच काळातला ‘हरी हर वीर मल्‍लू’ हा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री व अभिनेते पवन कल्याण यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटावर धार्मिक संघर्ष दाखवला गेल्याची टीका केली जात आहे. त्याबद्दल पवन कल्याण यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘झूम’ या माध्यमाशी खास संवाद साधताना पवन कल्याण यांनी सांगितले, “हा हिंदू-मुस्लिम संघर्षावर आधारित चित्रपट नाही. हा चांगल्या आणि वाईट यांच्यातील संघर्षाचा प्रवास आहे.”

त्यानंतर ते म्हणतात, “दिग्दर्शक कृष जगर्लामुडी यांनी जेव्हा मला हा चित्रपट करण्याची कल्पना सांगितली, तेव्हा मला ती खूपच आवडली. ‘हरी हर वीर मल्‍लू’ या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणं महत्त्वाचं वाटलं. हा सिनेमा आम्ही कोविडच्या आधी सुरू केला आणि सुरुवातीपासूनच मला वाटत होतं की, इतिहासातील सत्य सांगायला आपण घाबरू नये.”

‘हरी हर वीर मल्‍लू’ हिंदू-मुस्लिम संघर्षावर आधारित नाही : पवन कल्याण

‘हरी हर वीर मल्‍लू’ या चित्रपटावर काही लोक धार्मिक संघर्ष दाखवल्याचा आरोप करीत आहेत. त्याबद्दल पवन कल्याण यांनी स्पष्ट केलं, “‘हरी हर वीर मल्‍लू’ हा हिंदू-मुस्लिम संघर्षावर आधारित चित्रपट नाही. हा चांगल्या आणि वाईटमधील संघर्षाचा प्रवास आहे. या चित्रपटात कोणत्याही धर्माचा अपमान केलेला नाही; पण इतिहासात ज्यांनी चुकीची कृत्यं केली, त्यांचं चित्रण प्रामाणिकपणे केलं आहे.”

आपला इतिहास खर्‍या रूपात सांगायला घाबरता कामा नये : पवन कल्याण

पुढे ते म्हणाले, “आपल्याला आपला इतिहास खर्‍या रूपात सांगायला घाबरता कामा नये. आपला इतिहास जसा आहे, तसाच तो मांडणं आवश्यक आहे. औरंगजेबच्या अनेक क्रूर कृत्यांची नोंद इतिहासात आहे. त्यानं आपल्या वडिलांना तुरुंगात पाठवलं, भावाचा खून केला, जबरदस्तीनं धर्मांतर केलं, जिझिया कर लावला, काशी विश्वनाथसारखी मंदिरं तोडली. हा कुठलाच प्रचार नाही, तर या सत्य घटनाच आहेत.”

दरम्यान, पवन कल्याण यांच्या ‘हरी हर वीर मल्‍लू’ या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर निधी अ‍गरवाल, सत्यराज, कबीर बेदी, नरगिस फख्री, अनुपम खेर व नोरा फतेही हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.