आज पाश्चात्त्य सिनेमे हे प्रादेशिक चित्रपटांप्रमाणेच भारतात गाजत आहेत. गेल्या काही काळात फारसा गाजावाजा न करता आलेले अॅनाबेले २, स्पायडरमॅन : होमकमिंग, थॉर राग्नारोक, जस्टिस लीग यांसारख्या चित्रपटांनी मिळवलेली लोकप्रियता आणि आर्थिक यश हे आज भारतीय निर्मात्यांसमोर भविष्यात उभे ठाकणारे मोठे संकट मानले जात आहे. याच पाश्र्वभूमीवर तब्बल ६ ऑस्कर नामांकन मिळवलेला ‘फँटम थ्रेड’ हा चित्रपट आता ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या विरोधात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी नाराजीचा सूर लावला. परंतु निर्माता पॉल थॉमस अँडरसन यांच्यासमोर भारतीय निर्मात्यांचा विरोध हा गांभीर्याचा विषय नसून भारतात वेगळ्या धाटणीच्या सिनेमांविरोधात निर्माण केले जाणारे राजकीय वातावरण हा चिंतेचा विषय आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘इंदु सरकार’, ‘न्यूड’, ‘एस दुर्गा’, ‘पद्मावत’ या सिनेमांविरोधात जे रणसंग्राम माजले ते पाहून पाश्चात्त्य दिग्दर्शकांच्या मनात जणू धडकीच भरली आहे. २५ डिसेंबर २०१७ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेला ‘फँटम थ्रेड’ हा १९५० सालच्या लंडनमधील एका गाजलेल्या ऐतिहासिक नाटकावर आधारित चित्रपट आहे. हे नाटक ज्या काळात गाजत होते त्या वेळी भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकात काही प्रमाणात इंग्रजांची भारतीयांबद्दलची भूमिका दिसते. या पाश्र्वभूमीवर विचार करता हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या राणी पद्मावतीच्या कथेवरून राजपूत संघटना आणि करणी सेनेने जो वाद उठवला तसाच काहीसा प्रकार ‘फँटम थ्रेड’ या चित्रपटाबाबत घडण्याची भीती पॉल थॉमस यांना वाटते.११.४ दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने सहा ऑस्कर नामांकनासह भरपूर स्तुती मिळवली. परंतु दबक्या पावलाने आलेला फँटम थ्रेड भारतात प्रदर्शित करणे हे निर्मात्यांना खरे आव्हान वाटते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2018 रोजी प्रकाशित
‘फँटम थ्रेड’ दबक्या पावलाने भारतात
‘फँटम थ्रेड’ हा १९५० सालच्या लंडनमधील एका गाजलेल्या ऐतिहासिक नाटकावर आधारित चित्रपट आहे.
Written by मंदार गुरव

First published on: 04-02-2018 at 01:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phantom thread surprises with six nominations in 90th academy awards hollywood katta part