‘यमला पगला दीवाना २’ नंतर जवळपास चार वर्षांनी सनी देओल आणि बॉबी देओल हे भाऊ ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. देओल बंधूंचा ‘पोस्टर बॉईज’ या आठवड्यातील हिट चित्रपट ठरेल अशी अपेक्षा होती. पण, एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत असल्यावर सनीचा ढाई किलोचा हातही काहीच करू शकत नाही. श्रेयस तळपदेने अभिनयासह दिग्दर्शित केलेल्या ‘पोश्टर बॉईज’सोबत अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला.

वाचा : होय, त्यानंतर मी मद्याच्या प्रचंड आहारी गेलो- कपिल शर्मा

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी ‘पोस्टर बॉईज’ पहिल्या दिवशी तीन कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली होती. ‘ चित्रपट पहिल्या दिवशी तीन कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात देओल बंधूंचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे तेथे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो’, असे गिरीश म्हणाले होते.

वाचा : मलायकासोबतच्या घटस्फोटावर अरबाज म्हणतो..

गिरीश जोहर यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘पोस्टर बॉईज आणि ‘डॅडी’ची बॉक्स ऑफिसवर धिम्या गतीने सुरुवात झाली. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा केवळ १५ टक्के प्रतिसाद मिळाला.’ तर व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार चित्रपटाने १.७५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे कळते.

‘पोस्टर बॉईज’ चित्रपट समीक्षकांच्याही काही खास पसंतीस पडला नाही. मराठीतील ‘पोश्टर बॉईज’ या हिट चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘पोस्टर बॉईज’चे दिग्दर्शन श्रेयस तळपदेने केले असून, त्यात कामही केलेय. नसबंदीच्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.