वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारा एक प्रयोगशील अभिनेता म्हणून अभिनेता संदीप पाठक नेहमीच चर्चेत असतो. आज अक्षय्यतृतीयेचं निमित्त साधून अभिनेता संदीप पाठकने त्याच्या आगामी ‘राख’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केलंय. त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट लिहून या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारंनी सुद्धा त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आज १४ मे रोजी अक्षय्यतृतीया सोबतच अभिनेता संदीप पाठकचा वाढदिवस देखील आहे. याच निमित्ताने त्याने त्याच्या आगामी ‘राख’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेता संदीप पाठक हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या पोस्टरमध्ये तो एका रेल्वे रूळावर डोकं टेकवत बसलेला दिसून येत आहे. यात तो रेल्वे येण्यापुर्वी रूळांमध्ये आवाज येतोय का, हे बघताना दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर भिती, आक्रोश आणि निराशा असलेली दाखवण्यात आलीय. हा एक सायलेंट चित्रपट आहे.

प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं; पण हसवणं खूपच कठीण असतं. आपल्या दिलखुलास अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद हसविणारा संदीप पाठक यंदा एका विक्षिप्त भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अभिनयाची छाप पाडत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात त्याचा सफाईदार वावर आहे. असा हा हरहुन्नरी अभिनेता संदीप पाठक प्रथमच एका सायलेंट चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकताना दिसून येणार आहे.

या चित्रपटाबाबत एका माध्यमाशी बोलताना अभिनेता संदीप पाठक म्हणाला, “सायलेंट चित्रपट असल्याने यात कोणताही शब्द- संवाद अथवा वाक्य नाही, कलाकारांचा आवाज नाही. त्यामुळे अर्थातच कलाकार म्हणून एक चॅलेंजिंग भूमिका वाट्याला आल्याचे समाधान मिळालं आहे.” यापुढे बोलताना तो म्हणाला, मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच सायलेंट सिनेमाची निर्मिती होत आहे आणि त्याचा एक भाग असल्याचा आनंद देखील माझ्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण असल्याचे संदीपने आवर्जून सांगितलं.

या चित्रपटाची शूटिंग बदलापूर सारख्या ठिकाणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे सर्व थिएटर्स बंद आहेत. करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अजून काही महिने थिएटर्स सुरू होणार नाहीत. ही सर्व परिस्थिती पाहता हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा विचार करू केला जाऊ शकतो, असं देखील बोललं जातंय. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो, असं देखील बोललं जातंय.